‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागाच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या पाचही एकांकिकांनी आपल्या अभिनयाने आणि विषयांच्या विधायक निवडीने प्रेक्षकांबरोबरच परीक्षकांवरही मोहिनी टाकली. पहिली घंटा झाल्यानंतर कलाकारांची होणारी धावपळ, नेपथ्यांची जुळवाजुळव, प्रयोग धमाकेदार व्हावा यासाठी केलेले सारे प्रयत्न सार्थकी लागले.

यावेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित कलावंतांनीही तरुण कलावंतांचे तोंडभरून कौतुक केले.  तरूणाईला लोकांकिका हे चांगले व्यासपीठ असून,  त्या व्यावसायिक नाटकाच्या तोडीच्या असल्याचा सूर  या वेळी उमटला.

विद्यार्थ्यांनी एकांकिकांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत. अनेकदा तरुणाईकडे समाजमाध्यमाच्या अधीन झाल्याचे मानून दुर्लक्ष केले जाते. पण समाजमाध्यमांपेक्षा अशा व्यासपीठांवर व्यक्त होण्याला विधायक  स्वरूप आहे याचीही त्यांना जाणीव आहे. विद्यार्थी समकालीन विषयांची निवड करून व्यक्त होत असताना  विविध विषयांवर त्यांच्या दृष्टिकोनातून भाष्य करतात. त्यांच्या विचारांना तंत्रज्ञानाची भक्कम जोड मिळत असल्यामुळे ते प्रेक्षकांपर्यंत सर्वसमावेशकपणे पोहोचते. – सीमा देशमुख, अभिनेत्री

गेल्या तीन वर्षांमध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा दर्जा वाढला आहे. या व्यासपीठामुळे मुलांसमोर अभिनय क्षेत्रातील मोठं कलादालन खुले होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून माझे स्पध्रेच्या नाशिक, पुणे, मुंबई या केंद्रात सादर होणाऱ्या एकांकिकांवर लक्ष आहे. यातून चांगल्या कलाकारांना संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो. स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांच्या अभिनयात परिपक्वता आहे, याचबरोबर त्याचे कुठेही अवडंबर नाही याचे विशेष कौतुक करायला हवे. – श्रीरंग देशमुख, अभिनेता

आजूबाजूला जे घडत आहे, त्यावर भाष्य करणारे विषय आणि दर्जेदार अभिनय हे ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावरून प्रकर्षांने पुढे आले आहे. अभिनयाबरोबरच संगीत, प्रकाशयोजन, नेपथ्य यावर पकड असल्यामुळे मुलांनी सादर केलेल्या एकांकिका प्रेक्षकांना भावल्या. अशा स्पर्धामध्ये सातत्याने सहभागी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिनयात परिपक्वता आली आहे. – अतुल परचुरे, अभिनेता

सर्वच स्पर्धकांच्या एकांकिका खूप चांगल्या झाल्या असल्याने परीक्षकांपुढे कोणाची निवड करायची हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. ही राज्यस्तरीय लोकांकिका स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक विभागातील उत्कृष्ट एकांकिका पाहण्याची संधी मिळते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले आहे. महाविद्यालयीन पातळीवर सादर केल्या जाणाऱ्या एकांकिकेत कलाकारांच्या अभिनयात प्रामाणिकपणा असतो आणि उत्साह असतो. या स्पर्धाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची चांगली संधीही मिळते. -प्रथमेश परब, अभिनेता

लोकसत्ता लोकांकिकामध्ये सहभागी झालेल्या एकांकिकांच्या विषयांमध्ये वैविध्य होते. या स्पर्धाच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्या कलाकारांचा उत्साह पाहण्याची संधी मिळते. प्रत्येकाने चांगला अभिनय करून आपल्या एकांकिका ताकदीने सादर केल्या. – राणी वर्मा, पाश्र्वगायिका

 

दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न

साधी, सरळ-सोपी कथा आणि दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न यामुळे आम्हाला स्वीकारले जाईल का, बक्षीस मिळेल का याची शंका होती; पण आमचे सादरीकरण दाद व दखल घेण्याजोगे ठरले याचा आनंद आहे. आमच्या या एकांकिकेत लेखक वगळता नेपथ्य, संगीत आदी सर्व बाबी महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांनी सांभाळल्या होत्या. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या एकांकिकेचा विजय झाला. – रोहित कोतेकर, रोहित मोहिते, ‘दप्तर’ एकांकिकेचे दिग्दर्शक 

 

महाअंतिम फेरीत जिंकण्याचा प्रयत्न करू

‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद आहे. तसेच अभिनयासाठीही पारितोषिक मिळाल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे. आता आणखी  जोमाने तालीम करून महाअंतिम फेरीही जिंकण्याचा प्रयत्न करू. – रोहन सुर्वे, सवरेत्कृष्ट अभिनेता- ‘दप्तर’ 

 

छोटय़ा शहरांमधील गुणवत्ता पाहायला मिळाली

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेमुळे रंगभूमीला नवे कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मिळणार आहेत. हे सर्व विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात आणि त्यांची शिकण्याचीही तयारी असते. आत्तापर्यंत ही गुणवत्ता मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या शहरांपुरतेच मर्यादित आहे असे वाटत होते; पण ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेमुळे राज्यातील अन्य छोटय़ा शहरांमधील गुणवत्ता व अनेक मेहनती, उत्साही नवीन चेहरे पाहायला मिळाले.  – विद्याधर पाठारे, आयरिस प्रॉडक्शन

 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ

लोकांकिका-लोकांकिका स्पर्धेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे. ही स्पर्धा म्हणजे त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ आहे. नाटकाच्या सादरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी आम्ही पुरवतो. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असलेला प्रयोग सादरीकरणाचा खर्च कमी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. – रवी मिश्रा, ‘अस्तित्व’