मुंबईत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीला जल्लोषात सुरुवात
स्त्री-पुरुष नातेसंबंध हा कळीकाळाचा विषय. मात्र बदललेल्या काळात मिळालेल्या आर्थिक आणि वैचारिक स्वातंत्र्यातून स्त्रीमन इतक्या वेगाने बदलत गेले की त्यांच्या मनाची आंदोलने झेलायची कशी याबद्दलचा गोंधळ पुरुषांच्या मनात उडाला नसेल तरच नवल! अजूनही स्त्रीच्या मुक्तविचारांबद्दल फारसे मोठय़ाने बोलले जात नसताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एकांकिके तून प्रगल्भपणे या विषयाची सहज मांडणी केली गेली. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीत अगदी शाळकरी मुलाच्या पाठीवरचे ‘दप्तर’ही बोलते झाले आणि त्याने बाप-मुलाच्या नात्याबद्दलच्या गोष्टी हळुवार उलगडल्या. विचार-विषयांचे कुठलेही बंधन न ठेवता, चौकटीबाहेर जात वेगळे नेपथ्य आणि मांडणीतून मुंबईकर महाविद्यालयीन तरुणाईने प्राथमिक फेरीत जान आणली.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीची सुरुवात शनिवारी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत झाली. ‘लोकांकि का’च्या या नव्या पर्वाच्या रंगमंचावर दरवर्षी सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांबरोबरच काही नव्या महाविद्यालयांतील स्पर्धकांनीही हजेरी लावली आहे. पहिल्यांदाच या रंगमंचावर येऊनही ज्या आत्मीयतेने आणि धीटपणे विद्यार्थ्यांनी कुठलीही भीडभाड न बाळगता राजकारण-समाजकारणातील चालू घडामोडींपासून नातेसंबंधापर्यंतचे विषय मांडले. ते पाहून परीक्षकांनाही स्पर्धकांना कौतुकाने दाद दिल्याशिवाय रहावले नाही. वेश्यांच्या मुली या नेहमीच समाजाच्या मुख्य प्रवाहात आपल्याला यायला मिळावे म्हणून धडपडत असतात. नाकारल्या गेलेल्या समाजाची एक समांतर व्यवस्था आपल्याबरोबर नांदते आहे, याची जाणीव आपल्याला नसते हे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल. पण त्या मुलींच्या जागी उभे राहिल्यानंतर आपल्याला कितीही शिकलो, पुढे गेलो तरी त्या प्रवाहात जाता येणार नाही ही भावना किती खोलवर जाळणारी असेल, हे जाणवते. आचार्य महाविद्यालयाच्या मुलींनी अवघ्या एका दिवसाच्या तालमीत प्रभावीपणे ही एकांकिका मांडली. तर सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही ‘चैत्यभूमीवर श्रीगणेश’ ही नावातूनच वेगळा विचार मांडणारी एकांकिका सादर केली. या वेळी परीक्षकोंबरोबरच स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असलेल्या ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या वतीने रागिणी चुरी, नाटय़कर्मी दीपक करंजीकर उपस्थित होते.
एकांकिकांमध्ये नवीन विषय मांडताना त्याला तितक्याच वेगळ्या पण आकर्षक नेपथ्याची जोड देण्याची विद्यार्थ्यांची धडपडही तितकीच महत्त्वाची ठरली. विशेषत: कीर्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘लास्ट ट्राय’ या विषयासाठी वेगळ्या प्रकारे नेपथ्य उभारले. एम. डी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेली ‘दप्तर’ ही विषयाबरोबरच नेपथ्यामुळे वेगळी ठरली. ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने आठही केंद्रांवर तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पध्रेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. लोकांकिकाच्या मंचावरचे हे नाटय़रंग महाअंतिम फेरीच्या माध्यमातून ‘झी युवा’ वाहिनीवरून पाहता येणार आहेत.
आजच्या फेरीत नामांकित महाविद्यालयांचा सहभाग
मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी, नामांकित महाविद्यालयांचे स्पर्धक ‘लोकांकिका’च्या मंचावर आपल्या एकांकिका सादर करणार आहेत. चेतना महाविद्यालय, रुपारेल महाविद्यालय, डहाणूकर महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, व्हीजेटीआयसारख्या नामांकित आठ महाविद्यालयांमध्ये प्राथमिक फेरीची लढत रंगणार आहे.