मुंबई : कलेतील सच्चेपणा जपणारा, स्वत:तील अभिनय कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी धडपडणारा अभिनेता अशी ओळख असलेले पंकज त्रिपाठी यंदा ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रंगभूमीवरून अभिनयाचे बाळकडू घेऊन चित्रपट माध्यमात स्वत:ची अभिनयशैली निर्माण केलेल्या या बहुगुणी, अस्सल कलावंताचे अनुभवी बोल ऐकण्याची संधी युवा रंगकर्मींना या निमित्ताने मिळणार आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरराज्य महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा शनिवार, २१ डिसेंबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार आहे. आठ विभागातील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांमध्ये महाअंतिम फेरीत चुरशीची स्पर्धा होणार असून त्यातून महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ निवडली जाणार आहे. शनिवारी सकाळी पावणेदहापासून महाअंतिम सोहळा सुरू होईल. अभिनयासह विविध विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पंकज त्रिपाठी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.

हेही वाचा >>>तळोजा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी व पोलीस शिपायाला अटक; १० हजारांची लाच

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर आपली एकांकिका सादर करण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयातून आलेले युवा रंगकर्मी धडपडत असतात. त्यांना पंकज त्रिपाठी यांचे अनुभव, विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

त्रिपाठी यांच्या मते कलाकारांनी अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे आहे. बिहारमध्ये एका लहानशा गावातून आलेल्या या कलाकाराला छाऊ, कलरी, दशावतार सारख्या लोककलांमधून अभिनयाची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांनी दिल्लीत ‘एनएसडी’मध्ये प्रवेश घेतला. त्रिपाठी यांचे रंगभूमीवरचे आणि चित्रपट माध्यमातील अनुभव, ‘एनएसडी’च्या प्रशिक्षणादरम्यानच्या आठवणी ऐकण्याची पर्वणी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून मिळणार आहे.

प्रायोजक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण

सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर

सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ

पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स

साहाय्य : अस्तित्व

टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स