‘मेजवानी परिपूर्ण किचन’मध्ये  ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेष

महाराष्ट्रातील विविध प्रांत, तिथले चविष्ट खाद्यपदार्थ यांची सफर पाच नामवंत शेफच्या माध्यमातून घडवणाऱ्या ‘मेजवानी परिपूर्ण किचन’च्या ‘लोकसत्ता पूर्णब्रम्ह’ विशेष कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या या मराठमोळ्या पदार्थाच्या पंगतीची गंमत ९ जुलैपर्यंत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील चविष्ट पण तितक्याच सकस व पोषणमूल्य असणाऱ्या खाद्यपदार्थाची ओळख या कार्यक्रमातून होणार आहे.

‘मेजवानी परिपूर्ण किचन’ कार्यक्रमात मोहसिना मुकादम (कोकण), मंजिरी कपडेकर (पश्चिम महाराष्ट्र), आशालता पाटील (खान्देश), सायली राजाध्यक्ष (मराठवाडा), विष्णू मनोहर (विदर्भ) हे नामवंत शेफ सहभागी होणार आहेत. या शेफकडून विविध खाद्यपदार्थाची प्रात्यक्षिके दाखविली जाणार असून ती खवय्यांसाठी मेजवानीच ठरणार आहे.

‘विम’ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे ‘एलजी’ हे सहप्रायोजक असून टेस्ट पार्टनर ‘रामबंधू’ आहेत. पॉवर्ड बाय ‘केसरी’, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘आयुशक्ती’ असून ‘कलर्स मराठी’ हे टेलिव्हिजन पार्टनर आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘मेजवानी परिपूर्ण किचन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून खवय्यांना दररोज दुपारी दीड वाजता ही खाद्यभ्रमंती करता येणार आहे.

काही दिवसांपूर्वी ठाणे आणि मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या अंकाचे प्रकाशन झाले होते. त्या कार्यक्रमात हे पाचही नामवंत शेफ सहभागी झाले होते. या कार्यक्रमातही त्यांनी विविध खाद्यपदार्थाची प्रात्याक्षिके दाखविली होती.  ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ हा अंक वृत्तपत्र विक्रेते आणि प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.