लोकसत्ता ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या आठ स्पर्धकांसाठी ‘लोकसत्ता’तर्फे गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘विश्वेश्वर सहकारी बँक लि.-पुणे’, एमआयटी-औरंगाबाद, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी-औरंगाबाद) ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेची महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असणार आहेत.
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध विषयांवर आपली थेट मते, विचार व्यक्त करता यावेत यासाठी गेली दोन वर्षे ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात येत आहे. ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, नगर, रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा झाली. प्रत्येक विभागाच्या विभागीय अंतिम फेरीत पहिला आलेला विद्यार्थी महाअंतिम फेरीत सहभागी होणार आहे.
महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या राज्यातील आठ स्पर्धकांनी तयारीला कसून सुरुवात केली आहे. महाअंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांसाठी ‘लोकसत्ता’तर्फे गुरुवारी एका कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. विषयाची मांडणी आणि तयारी कशी करावी, कसे बोलावे याबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी महाअंतिम फेरीला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तर गेल्या वर्षी ‘राशिचक्र’कार शरद उपाध्ये प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी काय बोलायचे आहे त्याबाबत विचारांची स्पष्टता पक्की हवी. म्हणजे प्रत्यक्ष बोलताना कणमात्र गोंधळ उडत नाही. बोलताना ते बोली भाषेत जास्तीत जास्त बोलले जाईल हे कटाक्षाने पाहावे. अनाठायी आलंकारिक भाषा आणि मोठमोठाली सुविचारवजा वाक्य यांचा वापर करू नये. साधी सोपी बोली, मांडणीतला नेमकेपणा आणि संवाद केल्यासारखे समोरच्यापुढे मांडणे यातून श्रोत्यांना सहजपणे आपलेसे करून घेता येते. उदाहरणार्थ पु. ल. देशपांडे कायमच आपल्या कोणत्याही भाषणाची सुरुवात करताना ‘तुम्हाला सांगतो’, असं म्हणत. त्यामुळे ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते आपल्यालाच सांगत आहेत असे वाटायचे. शब्द निवडीतला नेमकेपणा, मांडणीतला सोपेपणा, उत्स्फूर्तता हे सूत्र बाळगले तर समोरच्यालाजिंकून घेता येणे शक्य होते.
– सुधीर गाडगीळ प्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार आणि ललित लेखक
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्व गुण वाढीस लागण्यासाठी अशा वक्तृत्व स्पर्धा आवश्यक आहेत. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ या स्पर्धेच्या माध्यमातून ते काम केले जात असून हा उपक्रम स्तुत्य व कौतुकास्पद आहे. या स्पर्धेतील चांगले विद्यार्थी वक्ते तसेच महाराष्ट्रातील गाजलेले मान्यवर यांच्या भाषणांच्या छोटय़ा छोटय़ा चित्रफिती ‘सामाजिक माध्यमां’वर ‘लोकसत्ता’ने टाकाव्यात. चांगला वक्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास, वाचन, चिंतन करावे. तुम्ही जो विषय मांडणार आहात तो हृदयातून मांडावा.
– विश्वास नांगरे पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक
बोलण्याची देणगी मिळालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी युवकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या उपक्रमाचे कौतुक आहे. बुद्धिवान विद्यार्थ्यांना ओघवतेपणाने व्यक्त होताना मी गेल्या वर्षी पाहिले. अशा सुप्तावस्थेतील कलेला पैलू पाडून त्याचे आकर्षक सादरीकरण लोकांसमोर आणणाऱ्या ‘लोकसत्ता’ला शतश: धन्यवाद. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी-युवकांमधील ‘पुलं’, ‘अत्रे’, ‘गडकरी’ व्यासपीठावर प्रकट होणार आहेत.
– शरद उपाध्ये ‘राशिचक्र’कार कार्यक्रम सादरकर्ते
कोणालाही आपलेसे करून घ्यायचे असेल तर वक्तृत्व कलेखेरीज पर्याय नाही. वक्तृत्वाची कला साध्य करावयाची असेल तर आधी चांगले वाचन करणे महत्त्वाचे आहे. वाचनातून आपल्याला कोणत्याही विषयाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते. बोलताना जो विषय मांडायचा त्याची पुरेपूर माहिती नसेल तर ते व्याख्यान चांगले होत नाही. म्हणूनच ‘अभ्यासोनि प्रकटावे’ असे समर्थानी जे म्हटले आहे त्याला फार अर्थ आहे. ‘बोलता वक्ता जरी अडखळला तरी महत्त्व गेले’ असेही त्यांनी नमूद केले आहे.
– शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’ पुणे, ‘आयसीडी’ औरंगाबाद (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ औरंगाबाद.