मुंबई : मराठी भाषेची गोडी युवा पिढीसह इतरांमध्येही रुजवण्यासाठी राज्यातील विविध महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळे अस्तित्वात आहेत. आता ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ (एलएसइ) येथे मराठी मंडळाची (द मराठी सोसायटी) स्थापना करण्यात आली आहे.

जगप्रसिद्ध ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ येथील विद्यार्थी संघटनेच्या (‘एलएसइ’ स्टुडंट्स युनियन) अंतर्गत अनेक समित्या अस्तित्वात असून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तेथे विविध भारतीय भाषांची आणि परदेशी भाषांची मंडळे कार्यरत आहेत. परंतु मराठी भाषिक विद्यार्थ्यांची संख्या अधिक असूनही मराठी मंडळ अस्तित्वात नव्हते. या पार्श्वभूमीवर ‘एलएसइ’मध्ये लोकनीति व प्रशासन (पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तीर्था उदय सामंत हिने मराठी विद्यार्थ्यांना एकत्र आणून मराठी मंडळाची स्थापना केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या महिन्यात संपूर्ण चाचपणी करून आणि सर्व नियम व निकषांची पूर्तता करून २० जानेवारी २०२५ रोजी मराठी मंडळाची ‘एलएसइ स्टुडंट्स युनियन’ अंतर्गत अधिकृत नोंदणी झाली. सध्या ‘एलएसइ’मधील मराठी मंडळाच्या अध्यक्षपदी तीर्था सामंत, खजिनदारपदी मौसमी चव्हाण आणि सचिवपदी अभिषेक सुडके हे विद्यार्थी कार्यरत आहेत.

‘एलएसइ’मधील मराठी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा व साहित्यावर आधारित विशेष सत्र व समूह चर्चांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नामांकित मराठी लेखक, इतिहासकार, अर्थतज्ज्ञ, कलाकार आदी विविध क्षेत्रातील मंडळी सहभागी होतील. महाराष्ट्रासह भारताशी संबंधित लंडनमधील विविध ठिकाणांना प्रत्यक्ष भेट, लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानास भेट, मराठी भाषा गौरव दिन, काव्यलेखन व वाचन, पुस्तकातील निवडक वेच्यांचे अभिवाचन, विविध कार्यशाळा, मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, गणेशोत्सव, दिवाळी आदी विविध सण – उत्सव साजरे करणे, महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीची ओळख आदी निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वर्षभरातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेणारा विशेषांकही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या १९ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने ‘एलएसइ’मधील मराठी मंडळाच्या कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एलएसइ’ येथे पंजाबी, तेलुगू, उर्दू, मल्याळम, तमिळ, बंगाली आदी विविध भारतीय भाषा आणि परदेशी भाषांची मंडळे कार्यरत आहेत. परंतु मराठी भाषिक तसेच महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक असूनही मराठी मंडळ अस्तित्वात नव्हते. सर्व नियम पाळून आणि निकषांची पूर्तता करून ‘एलएसइ’मध्ये मराठी मंडळाची स्थापना करण्यात आली, असे तीर्था सामंत हिने सांगितले.