पालिकेची परवानगी न घेता छोटय़ा रुग्णालयांकडून उपचार; बोरिवलीतील सात रुग्णालये चौकशीच्या फेऱ्यात
शैलजा तिवले
कोणतीही लक्षणे नसलेल्यांना दाखल करून त्यांच्या चाचण्या करणे, करोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतरही पालिकेची परवानगी नसूनही उपचार करणे असे सर्रास प्रकार बोरीवलीतील छोटय़ा रुग्णालयांमध्ये आढळून येत आहेत. या रुग्णालयांवर पालिकेकडून लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
अतिरिक्त बिले आकारण्याच्या तक्रारींवरून बोरीवलीतील अपेक्स (बाभई), अपेक्स (चंदावरकर रस्ता) मंगलमूर्ती आणि धनश्री या चारही रुग्णालयांची करोना उपचाराची परवानगी पालिकेने रद्द केल्यानंतर आता रुग्णांसह पालिकेची फसवणूक करणाऱ्या बोरीवलीतील छोटय़ा नर्सिग होमकडे पालिकेने मोर्चा वळविला आहे.
बोरीवलीमध्ये झोपडपट्टी विभागांमध्ये करोना संसर्ग नियंत्रणात असला तरी इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणात पसरत असल्याचे जुलैमध्ये निर्दशनास आले. पालिकेने याचे विश्लेषण केल्यावर मात्र धक्कादायक चित्र समोर आले. दरदिवशी पालिकेच्या मुख्य कक्षातून करोनाबाधित रुग्णांची यादी विभागीय करोना नियंत्रण कक्षाला मिळते. त्यांच्याशी संपर्क केल्यावर यातील बहुतांश रुग्ण आधीच रुग्णालयांमध्ये दाखल असल्याचे आढळले. त्यात अनेकजणांत कोणतीही लक्षणे नव्हती. याचा मागोवा घेताना डॉक्टर, खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालये यांच्या संगनमताने रुग्णांना पोटदुखी, खांद्याला मार लागणे अशा छोटय़ा कारणांसाठीही रुग्णालयात दाखल केले जात असल्याचे पालिकेला आढळले. तिथे त्यांच्या चाचण्या केल्या जातात. करोनाबाधित आढळल्यावर तिथेच उपचार केले जातात आणि रुग्ण सात ते आठ दिवसांनी घरीदेखील जातो. पालिकेला मात्र हे कळविले देखील जात नाही.
पालिकेने करोना उपचारासाठी विभागामध्ये काही रुग्णालये निश्चित केली आहेत. मात्र तरीही केवळ रुग्णांना लुबाडण्यासाठी म्हणून परवानगी नसताना करोनाबाधित रुग्णांना ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याचे प्रकार बोरीवलीतील सात रुग्णालयांमध्ये आढळले आहेत.रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर ही रुग्णालये रुग्णांना करोना रुग्णालयांमध्ये हलविण्याची मागणी करोना नियंत्रण कक्षाकडे करतात. लवकरच यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आर मध्य विभागीय सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले.या बहुतांश तक्रोरी स्थानिक नेते आणि मनसेचे सरचिटणीस नयन कदम आणि चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी तडीस नेल्या.
आर मध्य विभागात आत्तापर्यत ५११२ जणांना बाधा झाली असून सध्या सक्रिय रुग्ण १४५५ इतके आहेत.
खासगी प्रयोगशाळांच्या अहवालांचे गूढ
बोरीवलीच्या इमारतींमध्ये पालिकेने केलेल्या चाचण्यांमध्ये केवळ चार टक्के करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आता प्रतिबंधित भागांमध्ये सरसकट प्रतिजन चाचणीही केली जाते. त्यातही करोनाबाधित रुग्ण कमीच प्रमाणात आढळत आहेत.मात्र दुसरीकडे खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमधील अहवालांमधून जवळपास ६० टक्के रुग्णांचे अहवाल सकारात्मक येत आहेत. संसर्गाचे प्रमाण अधिक असेल तर ते पालिकेच्या चाचण्यांमधूनही दिसून यायला हवे होते. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांच्या चाचण्या इतक्या मोठय़ा प्रमाणात सकारात्मक येणे शंकास्पद असल्याचे कापसे यांनी व्यक्त केले आहे.
संसर्ग प्रसाराचा धोका अधिक
करोना उपचारांसाठी नियुक्त केलेल्या रुग्णालयांमध्ये केवळ करोनाबाधित रुग्ण ठेवले जात असून संसर्ग प्रसार होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजीही घेतली जाते. परंतु अशारितीने करोना रुग्णांसह इतर रुग्णांनाही ही रुग्णालये दाखल करून घेत असल्याने यांच्या संपर्कात आल्यानेही संसर्ग झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे संसर्ग प्रसाराचा धोका अधिक असल्याचेही कापसे यांनी स्पष्ट केले.