निवृत्त मेजर जनरल गगनदीप बक्षी यांचे प्रतिपादन, लष्कराकडून पाकला शेवटचा धक्का देण्याची मागणी

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

‘‘शक्तीशाली देश ऐकून घेत नाहीत. आपण मात्र, गांधीवादाचा उदोउदो करून आतापर्यंत खूप सहन करीत आलो. गेली ७२ वर्षे त्यामुळे आपले नुकसानच झाले आहे,’’ असे  ठाम प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल गगनदीप बक्षी यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.

‘‘एक शेवटचा धक्का दिल्यास पाकिस्तान संपेल आणि हा शेवटचा धक्का सैन्याच्या माध्यमातूनच दिला पाहिजे,’’ असेही त्यांनी सांगितले.

मेजर जनरल बक्षी गुरुवारी मुंबईत आले होते. त्यावेळी ‘लोकसत्ता’शी साधलेल्या संवादात; ३७० कलम रद्द करणे, काश्मीर प्रश्न आणि तिथली सद्यस्थिती, पाकिस्तानबाबतचे धोरण अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांनी मनमोकळी मते मांडली.

‘‘पाकिस्तानकडून मिळणाऱ्या युद्धाच्या धमक्या पोकळ आहेत. पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजूक आहे. युद्धाचा विचारही त्यांना परवडणारा नाही. एकच शेवटचा धक्का दिल्यास पाकिस्तान संपेल आणि तो सैन्याच्या माध्यमातूनच द्यायला हवा. बालाकोटचा हल्ला ही फक्त झलक होती हे दाखवून द्यायला हवे. पाकिस्तानला आपण पूरून उरू,’’ असे ते म्हणाले.

‘‘चीन आणि पाकिस्तान एकत्र झाले तर मात्र परिस्थिती थोडी कठीण होईल. मात्र, सध्याच्या परिस्थितीत चीन थेट युद्धात सहभागी होणार नाही. जपान, अमेरिका यांना तोंड देताना तो भारतीय सीमेवर शांतता राखण्यालाच प्राधान्य देईल,’’ अशी तार्किक मांडणीही त्यांनी केली.

‘‘३७० कलम रद्द करण्याचा निर्णय सत्तर वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता. आज ते कलम रद्द केल्यामुळे काश्मीरमधील जनता खूष आहे. आपले भवितव्य नेमके कशात आहे, हे तेथील नागरिकांना प्रथमच उमगले आहे. अधांतरी परिस्थितीतून त्यांची आता सुटका झाली आहे. भारताने काश्मीरबाबत इच्छाशक्ती दाखवली आहे आणि काश्मीर फक्त आमचाच आहे, हेदेखील या कृतीतून ठणकावून सांगितले आहे,’’ असे ते म्हणाले.  ‘‘काश्मीर तर विसराच परंतु पाकिस्तानव्याप्त काश्मीरही परत द्यावे लागेल, असा संदेश आम्ही पाकिस्तानला दिला आहे. त्यामुळे आपल्या कब्जातील काश्मीर वाचविण्यासाठी सध्या पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. तिबेटबाबत चीनला विचारून पाहा. ते इतर देशांना कोणतेही उत्तर  देण्यास जणू बांधीलच नाहीत. शक्तीशाली देश ऐकून घेत नाहीत. आपण मात्र गांधीवादाचा उदोउदो करून सहन करीत आलो,’’ असेही बक्षी यांनी स्पष्टपणे सांगितले.

काश्मीरमध्ये कितीही वर्षे सैन्य तैनात ठेवावे लागेल, तेवढे ठेवलेच पाहिजे. तिथे जितकी लष्करी ताकद उभी करावी लागेल, ती केलीच पाहिजे, असे ठामपणे नमूद करीत बक्षी म्हणाले, ‘‘सध्या काश्मीरमध्ये इतके सैन्य तैनात आहे की दगडफेकीच्या घटना होण्याची शक्यताच नाही. मेहबूबा मुफ्ती रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी देत होत्या, मात्र ती बाष्कळ बडबड ठरली आहे. काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तेथे आपल्याकडे अजिबात सैन्याची कमतरता नाही. १३ लाख लष्करी आणि १३ लाख निमलष्करी जवान तैनात आहेत. पंजाबमध्येही सैन्याने त्या परिसराला घेरल्यानंतरच शांतता प्रस्थापित झाली होती, हे लक्षात घ्यायला हवे. अजूनही देशाच्या कोणत्याही भागांत दगडफेक करणारे डोके वर काढत असतील तेथे सैन्य दुप्पट करायला हवे. जम्मू काश्मीरलाअडीच लाख कोटींचा निधी दिला होता. त्यातील तेथील नागरिकांपर्यंत काहीच पोहोचले नाही. तेथील नेत्यांनी ते पैसे हडप केले. आता काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे. दगडफेक सहन केली जाणार नाही हे तेथील समाज कंटकांना कळले पाहिजे.’

‘यूपीए’ने देशद्रोह केला!

‘काँग्रेसचे सरकार पाकसमोर कच खात होते. त्यांनी पाकिस्तानला डोक्यावर चढवून ठेवले. यूपीएने शस्त्र खरेदी बंद केली होती आणि तो देशद्रोह होता,’ असे विधान बक्षी यांनी केले.

अफगाणिस्तानच्या बाजूने उभे राहावे

‘अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य काढून घेतले की तेथे तालिबानचे राज्य असेल आणि त्याचा फायदा पाकिस्तानला होईल, अशा आशयाचे विधान पाकिस्तानी सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे. अफगाणिस्तान आमचा मित्र आहे. त्याचे नुकसान कराल तर आम्ही तुमचे करू. त्यावेळी तुम्ही हल्ला करण्याची वाटही आम्ही पाहणार नाही. त्यांची दादागिरी यापुढे दक्षिण आशियात चालणार नाही, याची जाणीव पाकिस्तानला करून द्यायला हवी.’