मुंबई : गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेल्या लोअर परेल रेल्वे उड्डाणपूल सुरू होण्यासाठी आता आणखी पुढची मुदत देण्यात आली आहे. पूर्व दिशेची बाजू सुरू करण्यासाठी आता ऑक्टोबर अखेरचा मुहूर्त महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केला आहे. पुलाची पश्चिम दिशेची एक बाजू जूनमध्ये वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी संपूर्ण पूल सुरू करण्यासाठी आधी जुलैमधील आणि नंतर सप्टेंबरमधील मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र हे दोन्ही मुहूर्त हुकले असून अद्याप पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.

हेही वाचा >>> मुंबईत झिकाचा रुग्ण सापडला; चेंबूरमधील सोसायट्यांमध्ये वैद्यकीय तपासणी सुरू

लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करी रोड, भायखळा परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला लोअर परळ (डिलाईल रोड) पूल धोकादायक बनल्यामुळे जुलै २०१८ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. विविध अडथळ्यांमुळे या पुलाचे काम रखडले. लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. रेल्वे आणि महानगरपालिका यांनी संयुक्तरित्या बांधलेला हा पूल आहे. रेल्वेच्या हद्दीतील ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्‍यासाठी मुंबई महानगरपालिकेले रेल्‍वेला निधी दिला आहे. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरून येणारे दोन आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा एक अशा एकूण ६०० मीटर लांबीच्या तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम महानगरपालिका करीत आहे. या कामासाठी महानगरपालिकेने १३८ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. या पुलाची पश्चिमेकडील मार्गिका १ जूनपासून वाहनचालकांसाठी खुली झाली. त्यामुळे गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचा एक टप्पा पूर्ण झाला. मात्र पूर्वेकडील बाजू अद्याप सुरू न झाल्यामुळे संपूर्ण पुलाचा अद्यापही वापर करता येत नाही. संपूर्ण पूल सुरू होण्यास महानगरपालिका प्रशासनाने आधी जुलै अखेरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हा पूल सुरू होईल असे  गेल्या महिन्यात सांगण्यात आले होते. ही मुदत आता हुकली असून आता ऑक्टोबर अखेरपर्यंत हा पूल सुरू करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई: लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्याचा पोलिसाला चावा, आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश

एप्रिलमध्ये हा पूल सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र काँक्रिटीकरणासाठी लागणारी खडी उपलब्ध होऊ न शकल्यामुळे दोन आठवडे काम रखडले होते. त्याआधी ट्रँकरच्या संपामुळे पाण्याअभावी काम रखडले होते. त्यानंतर हा पूल मे २०२३ मध्ये सुरू होणार होता. मात्र विविध कारणांमुळे दोन वेळा मुदत वाढविण्यात आली. नंतर तिसऱ्या वेळी १५ जूनची मुदत देण्यात आली. त्यानंतर या पुलासाठी जुलै अखेरीसची मुदत देण्यात आली होती. मग सप्टेंबर अखेरची मुदत देण्यात आली होती. मात्र आता ऑक्टोबर अखेरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. पावसामुळे या पुलाचे कॉंक्रिटीकरण करता आले नाही, त्यामुळे हे काम रखडल्याचे महानगरपालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोअर परळ येथील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे भागामध्ये पश्चिम रेल्वे, तर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. रेल्वे भागामध्ये एका जुन्या प्लेट गर्डरऐवजी नवीन दोन ओपन वेब गर्डर या पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.