मुंबई : काळबादेवी परिसरातील बांधकाम स्थळी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी चौघांना अटक केली होती. यावेळी बांधकाम ठिकाणी शिरलेल्या आरोपींनी तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी खंडणी व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणातील चारही आरोपींची न्यायालयाने जामीन दिला. सर्व आरोपींची १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
तक्रारदार निसार कुरेशी (४४) जोगेश्वरी येथील रहिवासी असून काळबादेवी येथील बांधकाम ठिकाणावर पर्यवेक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या बांधकाम स्थळी १९ मे रोजी सात ते आठ व्यक्ती आले. त्यावेळी त्यांनी राजकीय नेता रोहित गुप्ता याचे कार्ड दाखवून आपण माथाडी कामगार असून या बांधकाम स्थळी त्याच्याकडूनच कामे करून घेण्याबाबत त्यांनी सांगितले. त्यावेळी कुरेशी यांनी त्या सर्वांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा काही व्यक्ती बांधकाम स्थळी आले. त्यांनी कंत्राटदाराला भेटण्याचे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना खालीच अडवण्यात आले. त्यावेळी तुम्हाला कोणाकडूनही काम करायचे असेल, त्याच्याकडून करून घ्या. पण काम पूर्ण करायचे असले, तर २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. ती पूर्ण न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून हातापायाने व हेल्मेटने मारहाण केली.
याप्रकरणी कुरेशी यांच्या तक्रारीवरून एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (४), ११८ (१), ३५१ (३), १९१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी दशरथ पांडे, स्थानिक राजकीय पदाधिकारी रोहित गुप्ता यांना २१ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी जयेश वालंत्रा व आदित्य नायडू यांनाही अटक करण्यात आली. त्यांना शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. याप्रकरणात त्यांना नाहक अडवण्यात आले आहे. ते सर्व विद्यार्थी असून त्यांचा याप्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे बचाव पक्षाचे वकील सुनील पांडे यांनी न्यायालयाला सांगितले. यावेळी तक्रारदारानेही लेखी ना हरकत देऊन आरोपी या प्रकरणाशी संंबधित नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर चारही आरोपींची १० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर सुटका केली. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.