मुंबई : अपुऱ्या कागदपत्रांद्वारे मोठे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तिघांनी लखनऊ येथील एका व्यक्तीची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कुर्ला येथे घडला. याबाबत फसवणूक झालेल्या व्यक्तीने याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

तक्रारदार लखनऊ येथे वास्तव्याला असून ते तेथील घर विविध चित्रपट आणि मालिकेच्या चित्रीकरणासाठी भाड्याने देतात. यातून त्यांना मोठा नफा मिळत असल्याने घर आणखी मोठे करण्यासाठी त्यांना दहा ते बारा कोटी रुपये कर्ज हवे होते. ही बाब त्यांनी कुर्ला येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला सांगितली. त्यांनी त्यांची ओळख अनिस नावाच्या व्यक्तीबरोबर करून दिली. त्याने तत्काळ तक्रारदारांची भेट घेतली आणि त्यांना एका बँकेतून कर्ज देण्याचे अमिष दाखवले. यासाठी त्यांनी त्यांना ५० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले.

तक्रारदारांनी होकार देताच आरोपीने सुरुवातीला त्यांच्याकडून २५ लाख घेतले. त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडे पैशांची मागणी करून त्यांच्याकडून एकूण ४० लाख रुपये घेतले. मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही त्यांना बँकेकडून कर्ज देण्यात आले नाही. याबाबत त्यांनी वारंवार आरोपीकडे विचारणा केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तक्रारदारांनी याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.