मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज, गुरुवारी होत असून, पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास असलेल्या भाजप-शिवसेना युतीला किती जागा मिळतात याची उत्सुकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी युतीला एकतर्फी यश मिळेल, असा अंदाज वर्तविला असला तरी लढत चुरशीची होईल, हा दावा विरोधकांनी व्यक्त केला आहे.
मतमोजणीस सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होईल. दुपापर्यंत चित्र स्पष्ट झालेले असेल. दोनतृतीयांश यश मिळवून पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये युतीला चांगले यश मिळेल, असा अंदाज व्यक्त झाला आहे. या पाश्र्वभूमीवर युतीला किती जागा मिळणार, यात भाजपच्या जागा किती असतील, याची सर्वत्र उत्सुकता आहे. १९८५च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही एका पक्षाला १४५चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. १९९० मध्ये काँग्रेसला चार जागा कमी पडल्या होत्या. १९९५ पासून राज्यात युती किंवा आघाडीची सरकारे सत्तेत आली.
युतीला वातावरण अनुकूल असले तरी भाजप किती जागांचा पल्ला गाठणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. भाजपला १३० ते १३५ जागा मिळतील, असा दावा पक्षाचे नेते करीत आहेत. भाजपचे १४५चा जादुई आकडा गाठण्याचे स्वप्न यंदा साकार होण्याची शक्यता कमी दिसते.
शिवसेनेचे मावळत्या सभागृहात ६३ आमदार होते. शिवसेनेच्या जागा वाढतात की घटतात याबाबतही लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त वाढू नये, असाच भाजपचा प्रयत्न होता.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पानिपत होईल, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. गतवेळी काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. तेवढे यश मिळाले तरीही आघाडीसाठी समाधानकारक असेल.
