गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरुन अनेकजण आपल्या आठवणी शेअर करत असून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीदेखील शोक व्यक्त केला असून बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात असल्याची भावना व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे,” असं रश्मी ठाकरे म्हणाल्या आहेत.

Lata Mangeshkar Passes Away Live : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

“बाळासाहेब असताना आणि नंतर देखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीत,” असं सांगत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra chief minister uddhav thackeray wife rashmi thackeray on legendary singer lata mangeshkar demise sgy
First published on: 06-02-2022 at 12:38 IST