मुंबई : चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून म्यानमाराला नेऊन तरूणांना सायबर गुलामगिरीत ढकलल्या प्रकरणी महाराष्ट्राच्या नोडल सायबर पोलीस ठाण्याने चार जणांना अटक केली. सायबर फसवणूक व मानवी तस्करीचे हे प्रकरण आहे. गोवा पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली.सेवा केंद्रातील (कॉल सेंटर) कर्मचारी शाल्मन डेविड गायकवाड याची आरोपींनी फसवणूक केली होती. त्याच्या तक्रारीनंतर सखोल तपास करून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

आरोपींनी अशा प्रकारे अनेक तरूणांची फसवणूक केल्याचा संशय आहे. गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, त्यांना थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात त्यांना म्यानमारमध्ये नेण्यात आले. तेथील ‘झुक्सी’ नावाच्या एका सायबर फसवणूक करणाऱ्या कंपनीत त्याला जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडण्यात आले. त्याचे पारपत्र व इतर कागपत्रे काढून घेण्यात आली होती. गायकवाडने घरी परतण्याची इच्छा व्यक्त केल्यावर आरोपींनी त्यांच्याकडून ३,६०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ३ लाख रुपये) मागितले आणि पैसे न दिल्यामुळे त्याला डांबून ठेवले. या प्रकरणी आदित्य रवीचंद्रन ऊर्फ टायसन (२१), रुपनारायण रामधर गुप्ता (३५), टालॅनिटी नुलास्की (२२), आणि जेन्सी राणी डी डॅनियल यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची एक संघटित टोळी सक्रीय असून आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी परदेशातील चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून तक्रारदाराला सायबर गुलामगिरीत ढकलल्याचे तपासात निष्पन्न झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७ (२), १४३ (२), ३०८ (४), आणि ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी), तसेच इमिग्रेशन कायद्याचे कलम १० आणि २४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी आदित्य रवीचंद्रनने जामिनासाठी अर्ज केला असला, तरी पोलिसांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. यापूर्वीही तो अशा प्रकारच्या बनावट नोकरीच्या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे निदर्शनास आले असून, तो बेरोजगार तरुणांंकडून ८० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करायचा. त्याचा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचा संशय असून काही संशयीत परदेशात वास्तव्याला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी जामिनावर सुटल्यास पुरावे नष्ट करू शकतो, साक्षीदारांना धमकावू शकतो किंवा देशाबाहेर पळून जाऊ शकतो. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. आरोपींनी अशा प्रकारे अनेक तरूणांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याबाबत नोडल सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.