भाजपचे २२० पारचे स्वप्न भंगले * पक्षांतर केलेल्या अनेक दिग्गजांचा पराभव * पवारांच्या प्रचारबळाने आघाडीला उभारी * जनादेशातून प्रबळ विरोधी पक्ष तयार

मुंबई : जोरदार वादळे आली, प्रलयकारी महापूरही आले, पण त्याला तोंड देत ‘महाजनादेश’ आणि ‘जनआशीर्वादा’च्या जोरावर संकटांना परतवून लावून गड राखायचाच, अशा निर्धाराने ते दोघेही बुरुजांवर ठाम उभे राहिले आणि संकटे परतूनही गेली. त्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत असतानाच, अचानक परतीच्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आणि एका ‘पहाडा’ने पावसात भिजत साधी फटाक्याची माळ लावली.. सारेच डळमळले. तटबंदी डळमळीत होणार असे वाटू लागले आणि पुन्हा एकदा नव्या निर्धाराने दोघांनीही ओल्या बुरुजांवर छत्र्या धरल्या. अखेरच्या क्षणी गड कसाबसा सावरला!. मात्र, आभाळ निरभ्र असताना ज्या विश्वासाने सारे सुरळीत सुरू होते, त्याला धक्का बसलाच.. अनेक बिनीचे मोहरे कामी आले..

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्या क्षणापासून, ही निवडणूक एकतर्फीच होणार, विरोधक आहेतच कुठे, कुस्तीसाठी तुल्यबळ पैलवानच नाही, अशा जोशात शड्डू ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. सारे हेवेदावे विसरून उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या खांद्याला खांदा लावला आणि आता सत्तेच्या गडाला कोणताच धोका नाही या विश्वासाने दोघांनीही नवी रंगरंगोटीही सुरू केली. प्रचाराच्या अखेरच्या दोन-तीन दिवसांत मात्र, सत्ताकारणावर ढग दाटले. पाऊस बरसू लागला. काही ठिकाणी पूरही आला. त्याच पावसात भिजत शरद पवार नावाच्या वादळाने गडाला घेरले. समोरचा पैलवान तुल्यबळच नव्हे, तर ‘तेल लावून’ कंबर कसलेला आणि अनेक आखाडे गाजविलेला आहे, हे लक्षात आले आणि फडणवीस-ठाकरे यांनी सारी ताकद पणाला लावली. दमछाक झाली, पण आखाडा मारला.. लढाई अटीतटीची झाली. समोरच्या बाजूने गमावण्यासारखे फारसे नव्हतेच. उलट त्यांनी या लढाईत बरेच काही कमावले आणि आपल्याकडूनच गडावर जाऊन मिळालेली रसद तोडून, सत्तेच्या गडाला साध्या फटाक्यांच्या माळेनिशी हादरा दिला.

गुरुवारी दुपारनंतर भाजप-शिवसेनेच्या विजयाचा जल्लोष झाला, पण त्या जल्लोषातही, ‘आपटी बार’च जोरात वाजले. आता सत्तेच्या राजकारणाची सुरुवात होईल. टक्केवारीचे हिशेब मांडत, भाजपचा फायदाच झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. जनादेश भाजपलाच असल्याचे व विरोधकांना मतदारांनी नाकारल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले, पण पुढच्या सत्तेच्या राजकारणावर शिवसेनेचा वरचष्मा राहणार, हे मतदारांनाही कळून चुकले आहे.. ‘भाजपच्या सगळ्याच अडचणी मी समजून घेणार नाही, आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे’, असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिल्याने, ‘राखलेल्या गडा’वरही सारे काही शांत झालेले नाही, याची चुणूक दिसू लागली आहे. आता या गडावर भगवा फडकलेला असेल, पण कालपरवाचे झोडपून काढणारे वारे, यापुढेही गडाच्या आसपास घोंघावतच राहणार आहेत.. गडावरचा भगवा या वादळात फडफडत राहणार आहे. तो राखण्याचे नवे आव्हान आता मुख्यमंत्री या नात्याने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनाच पेलावे लागणार, याची स्पष्ट चिन्हेही दिसू लागली आहेत..