मुंबई: पावसाने निर्माण झालेली आपत्ती ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. आपत्कालीन स्थितीत शिवसैनिक आपत्तीग्रस्तांना मदत करत आहेत. दुसरीकडे सरकार ठेकेदारांचे खिसे भरत आहेत. माणसांची साधी कदर केली जात नाही, अशा शब्दांत राज्यभरात झालेल्या पूरस्थितीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
नांदेडमधील शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते केशवराव धोंडगे यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी मंगळवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असताना सर्वजण ‘मातोश्री’वर आलात त्यातून जिद्द दिसून येत असल्याचे सांगत त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी पूरस्थितीवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुंबईमध्ये नवीन नवीन ठिकाणी पाणी तुंबत आहे. विमानतळावरील पाणी साचल्याचे फोटो येत आहेत. त्यामुळे आता तेथे बंदर करायची गरज नाही. जहाज पण तिथेच येतील आणि विमान पण तिथेच उतरेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अदानींवरही निशाणा साधला. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील ११ गावांचे पुनर्वसन न करता तेथे धरणाचे काम सुरू केल्यामुळे मानवनिर्मित आपत्ती आल्याचा आरोपही त्यांनी केला. गावकऱ्यांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असते तर कोणाला जीव गमवायची वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.
चोर बाजारात माणसे दिसेनाशी झाली
राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी राजकारणामध्ये सध्या जो काही धुमाकूळ घातला जातोय, इथे माणूसच दिसेनासा झाला आहे. सगळे चोर दिसत आहेत, अशी टीका केली. कोणी पैसे चोरतोय, कुणी मत चोरतोय, कुणी पक्ष चोरतोय…या सगळ्या चोर बाजारामध्ये माणसे दिसेनाशी झाली आहेत, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.