मुंबई : राज्यात नवरात्रीत दोन दिवस रात्री बारापर्यंत गरबा व दांडियास परवानगी देण्यात आली आहे. नवरात्रीत आणखी एक दिवस रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी, याबाबत गृहखात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. मुख्यमंत्री शिदे लवकरच त्यावर निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

करोना काळानंतर दोन वर्षांनी यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय नवरात्रौत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गरबा व दांडियासाठी रात्री दहापर्यंत असलेली वेळ रात्री बारापर्यंत वाढवून देण्याची मागणी राज्यातील जनतेकडून व राजकीय कार्यकर्त्यांकडूनही होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि ध्वनिप्रदूषण कायद्यातील तरतुदींनुसार गरब्याची वेळ व ध्वनिवर्धकांचा वापर यावर मर्यादा आहेत.

यंदा गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांचा आवाज व वेळा मर्यादेपेक्षा अधिक ठेवूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नवरात्रीतही रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांचा वापर करून गरबा खेळण्याची परवानगी हवी, अशी राज्यातील नवरात्री मंडळांची मागणी आहे. त्यामुळे आणखी एक दिवस वेळ वाढवून देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.