मुंबई : राज्यभरातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील मोठ्या सहकारी संस्थांच्या म्हणजे सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकांसह २८५ सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने पुढे ढकलल्या आहेत. त्याच धर्तीवर संबंधित संस्थांनी मागणी केल्यास ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील लहान संस्थांच्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करता येईल, अशी माहिती सहकार विभागातून देण्यात आली.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बुधवारी परिपत्रक काढून अतिवृष्टी, पूरस्थिती असलेल्या भाागातील ‘अ’ आणि ‘ब’ गटातील सहकारी संस्थांची म्हणजे २८५ मोठ्या सहकारी बँका आणि सहकारी कारखान्यांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेताना ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील म्हणजे लहान सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया कायम ठेवली होती.
मोठ्या संस्थांना अतिवृष्टीचा फटका बसणार आहे, लहान संस्थांना अतिवृष्टीचा फटका बसणार नाही का. लहान संस्थांना एक आणि मोठ्या संस्थांना वेगळा न्याय का, अशी विचारणा झाल्यानंतर सहकार विभागाने अतिवृष्टी आणि पूरस्थिती भागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील लहान सहकारी संस्था म्हणजे ‘क’ वर्गातील सेवा सहकारी संस्था, नोकरदार सहकारी पतसंस्था, ग्राहक भांडार, सहकारी पणन संस्था, उपसा जलसिंचन योजना, मजूर संस्थांसह ‘ड’ वर्गातील २०० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या उपसा जलसिंचन, मजूर आणि जंगल कामगार सहकारी संस्था, अनुदान अप्राप्त सहकारी औद्योगिक संस्था, प्राथमिक विणकर सहकारी संस्था, १०० लिटरपेक्षा कमी दूध संकलन असलेल्या दूध संस्था, प्राथमिक कुक्कुट, मत्स्य, पशुधन सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येतील. पण, संबंधित संस्थेने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे तसा अर्ज करण्याची गरज आहे. अर्ज केल्यानंतर स्थानिक परिस्थितीचा विचार करून निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सहकार विभागातून देण्यात आली.
पूरस्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळे
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील मोठ्या सहकारी संस्थांच्या म्हणजे, ज्या सहकारी संस्थांचे क्षेत्र मोठे आहे. सभासद अनेक गावांमध्ये विखुरले आहेत. अशा संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता गृहीत धरून निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत, त्या आणखी रखडू नयेत म्हणून जाणीवपूर्वक सरसकट निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नाही.
लहान गावातील संस्थांचे सभासद कमी असतात. क्षेत्र गावापुरते मर्यादित असते. त्यामुळे लहान संस्थांच्या निवडणुका घेताना अडचणी येणार नाहीत, असा अंदाज असल्यामुळे लहान संस्थांचा निवडणूक कार्यक्रम कायम ठेवण्यात आला होता. पण, पूरस्थिती असेल, मोठी आर्थिक, जीवितहानी झालेल्या गावात निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवणे शक्य नाही, अशा संस्थांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे अर्ज केल्यास संबंधित संस्थेची निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार केला जाणार आहे.
पूरस्थितीमुळे ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील लहान सहकारी संस्थांना निवडणूक घेणे शक्य नसल्यास त्यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे अर्ज केल्यास निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार केला जाईल. – संतोष पाटील, सहसचिव, सहकार विभाग