मुंबई : राज्यातील भौतिकोपचार (फिजिओथेरपी) आणि व्यवसायोपचार (ॲक्युपेशनल थेरपी) पदव्युत्तर पदवी तसेच बी.एस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या आंतरवासिता कालावधीतील विद्यावेतनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

राज्यातील शासकीय भौतिकोपचार, व्यवसायोपचार पदवी अभ्याक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर २६ आठवड्यांचे आंतरवासिका (इंटरनशिप) प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे असते. तसेच या भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी इतर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे रुग्णालयातील बाह्य व आंतररुग्ण विभाग, अपघात विभाग, रेडिऑलॉजी, ओपीडी, प्रयोगशाळा,कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभागात सेवा देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या २३ वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भौतिकोपचार (फिजिओथेरपी) आणि व्यवसायोपचार (ओक्युपेशनल थेरपी) यांच्या विद्यावेतनात १ जून २०२५ पासून १० हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. मूळ वेतन व महागाई भत्ता व झालेली वाढ मिळून आता हे विद्यावेतन दरमहा ३३ हजार ७३० रुपये इतके असेल. यासाठीच्या ६७ लाख २० हजार रुपयांच्या आर्थिक तरतुदीसही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच बी एस्सी नर्सिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना १ जून २०२५ पासून ८ हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. यासाठीच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीसही मान्यता देण्यात आली आहे.