संदीप आचार्य राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवतानाच आता आरोग्य विभागाने सामान्य रुग्णांवरील उपचार वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या मागील दोन वर्षात आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांपासून ग्रामीण रुग्णालयांपर्यंत आरोग्य विभागाची जवळपास सर्व यंत्रणा करोना रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त होती. परिणामी सामान्य रुग्णांवरील उपचार तसेच विविध शस्त्रक्रिया जवळपास ठप्प झाल्या होत्या. याचा मोठा फटका ग्रामीण भागातील वृद्ध रुग्णांना बसला असून यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अस्थिशल्यक्रिया रखडल्या आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती तसेच या लाटेचा लहान मुलांना फटका बसू शकतो हे तज्ज्ञांचे म्हणणे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने त्या दृष्टीने आपली सज्जता ठेवली होती. करोनाची तिसरी लाट फारशी धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ऑक्टोबर- नोव्हेंबर पासून सामान्य रुग्णांवरील उपचारास सुरुवात करण्यात आली. मात्र करोना पूर्व काळातील रुग्णोपचाराचा विचार करता आरोग्य विभागाला बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभागातील कामकाजात गती आणावी लागेल असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकीकडे आरोग्य विभाग सामान्य रुग्ण तपासणी व उपचाराला प्राधान्य देऊ पाहात असतानाच दुसरीकडे करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. करोनाचे नवे प्रकार आढळून आले असून त्याचा प्रभाव किती असेल हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयापासून ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत संपूर्ण आरोग्य यंत्रणा सामान्य रुग्णोपचारासाठी प्रभावीपणे चालविण्याची धडक मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. करोनापूर्व काळात २०१९-२० मध्ये आरोग्य विभागाची रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण विभागात सहा कोटी ८६ लाख ४८ हजार ५२० रुग्णांवर उपचार करण्यात आले होते तर याच काळात ५० लाख २८८१ रुग्णांवर रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते. करोनाकाळात २०२०-२१मध्ये बाह्य रुग्ण विभागात तीन कोटी २७ लाख ३९ हजार २३३ रुग्णांची तपासणी झाली. हे प्रमाण करोनापूर्व काळातील रुग्णांच्या निम्म्यापेक्षा कमी होते तर आंतररुग्णांची संख्या सुद्धा जवळपास निम्मी म्हणजे २६ लाख २७ हजार ४८७ एवढी झाली होती. २०२१-२२ मध्ये सुमारे ३४ लाख ३५ हजार बाह्य रुग्णांची तपासणी झाली तर २७ लाख ३१ हजार आंतररुग्ण होते. करोनापूर्व काळातील रुग्णसंख्येशी तुलना करता मागील दोन वर्षात निम्म्याहून कमी रुग्णांवर उपचार करण्यात आले. अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता आरोग्य विभागाच्या जवळपास सर्व शस्त्रक्रिया ठप्प होत्या. रुग्णांसाठी आवश्यक असणार्या चाचण्या व उपचार सर्वच आघाड्या करोनामुळे बंद झाल्या होत्या. डिसेंबर पासून पूर्ण क्षमतेने आम्ही सामान्य रुग्णांवर उपचार करणे सुरु केल्याचे अतिरिक्त संचालक डॉ सतीष पवार यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील रुग्णोपचार वाढवणे हे आव्हान आम्ही स्वीकारल्याचे अतिरिक्त संचालक डॉ शेखर अंबाडेकर यांनी सांगितले. मोतीबिंदू शस्त्रक्रियांपासून वृद्धांवरील अत्यावश्यक शस्त्रक्रिया व उपचार वाढविण्यासाठी आमचे डॉक्टर सर्व प्रयत्न करतील असेही डॉ अंबाडेकर यांनी सांगितले.