मुंबई : ऐतिहासिक स्थानक असलेल्या सीएसएमटीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र हेरिटेज कन्झरव्हेटिव्ह समितीचीही मंजुरी मिळाली आहे. सीएसएमटी इमारत व परिसराचा पुनर्विकास हा खासगी विकासकांमार्फत केला जाणार आहे. पुनर्विकासाच्या कामाला सुमारे १,३५० कोटी रुपये खर्च येणार आहे. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करताना ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे. पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनचे वेगळे विभाग करणे, स्थानक अपंगस्नेही करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे, स्थानकाची पुनर्बाधणी आणि डागडुजी करणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत. शिवाय सीएसएमटी परिसरात ‘रेल मॉल’ही उभारण्याचा प्रयत्न असेल. त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाच्याही सुविधा असतील. पुनर्विकास सार्वजनिक खासगी भागीदारीवर होणार होता. यात एकाच कंपनीची निवड केली जाणार होती; परंतु ते रद्द करून आता हायब्रिड बिल्ड ऑपरेट पद्धत अवलंबली जाणार आहे. यामध्ये रेल्वे ४० टक्के आणि खासगीची ६० टक्के गुंतवणूक असेल. मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या या हेरिटेज इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का न लावता करण्यात येणार आहे. त्यामुळे नेमका प्रकल्प काय, प्रकल्पाचे होणारे काम इत्यादीची माहिती देतानाच त्यासाठी आवश्यक असणारी मंजुरी महाराष्ट्र हेरिटेज कन्झरव्हेटिव्ह समितीकडून आवश्यक होती आणि ती मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra heritage conservation committee sanction cstm redevelopment zws
First published on: 15-03-2022 at 04:08 IST