मुंबईतील ताडदेव येथील एम.पी. मिल कम्पाऊंडमधील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप असलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक आहेत. त्यात मेहता यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची आणि मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर आज अखेर मेहतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली नाही. ते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. त्यांनी माझ्याकडे अद्याप स्पष्टीकरण मागितलेलं नाही, असं मेहता यांनी माध्यमांसमोर सांगितलं.
एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याच्या आरोपावरून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत सापडले आहेत. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी आक्रमक मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. आजही दोन्ही सभागृहांमध्ये मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. गोंधळामुळं सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं. त्यातच मेहता यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा विधानभवन परिसरात ऐकायला मिळत होती. तसेच मेहता राजीनामा देणार असल्याचीही चर्चा होती. त्यावर आज मेहतांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली नाही. त्यांनी माझ्याकडे कोणतेही स्पष्टीकरण मागितलं नाही. ते याबाबत निर्णय घेण्यास सक्षम आहेत. ते घेतील तो निर्णय मला मान्य असेल. पक्षाचे प्रभारी माझ्याकडे स्पष्टीकरण मागतील त्यावेळी मी माझी भूमिका स्पष्ट करीन, असं मेहतांनी सांगितलं. मेहता यांनी राजीनाम्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं असलं तरी राजकीय वर्तुळात त्यांची गच्छंती अटळ असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता मुख्यमंत्री त्यांच्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
