‘इशरत जहाँची चकमक बनावटच’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातून राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी अनेक योग्य उमेदवार होते, पण पक्षाने मला संधी दिली. खासदार म्हणून निवडून गेल्यावर दिल्लीत महाराष्ट्राचे प्रश्न मांडीन, अशी ग्वाही माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी मंगळवारी दिली. तर भाजप आणि शिवसेना या दोघांनाही लक्ष्य करण्याचा इशारा विधान परिषदेचे पक्षाचे उमेदवार नारायण राणे यांनी दिला.

चिदम्बरम आणि राणे या दोघांनीही अर्ज दाखल केले. तेव्हा सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील आदी सारे नेते उपस्थित होते. मुंब्य्रातील इशरत जहाँ हिच्या चकमकीवरून वाद निर्माण झाला आहे. या संदर्भातील प्रतिज्ञापत्रात काँग्रेस सरकारच्या काळात बदल करण्यात आल्याचा आरोप झाला होता. तत्कालीन गृहमंत्री म्हणून चिदम्बरम यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही चकमक बनावट होती याचा पुनरुच्चार केला. आपल्यावर टीका केली जाते, पण या संदर्भात न्यायालयात सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र कोणी वाचले आहे का, असा सवालही केला. ही चकमक बनावट होती, असा ठपका चौकश समितीने ठेवला होता व न्यायालयाने ते मान्य केले होते.

वस्तू आणि सेवा कराबाबत मोदी सरकारने काँग्रेसशी चर्चा करणे आवश्यक आहे. काँग्रेसने आक्षेप घेतलेल्या तीन मुद्दय़ांवर भाजपकडून खुलासा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खडसे यांनी राजीनामा द्यावा

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या शैलीत भाजप आणि शिवसेना सरकारवर टीका केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत. त्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, अन्यथा पावसाळी अधिवेशनात हा विषय लावून धरू, असा इशाराही दिला.

चिदम्बरम ९५ कोटी तर राणे ७० कोटींचे धनी

माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी ९५ कोटींची मालमत्ता असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. चिदम्बरम, त्यांची पत्नी व अविभक्त हिंदू कुटुंब यांची एकूण जंगम मालमत्ता ही ५४ कोटी तर तर स्थावर मालमत्ता ही ४१ कोटींची आहे. चिदम्बरम यांच्याकडे ८० लाखांचे दागिने आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची जंगम मालमत्ता ही ४३ कोटी तर स्थावर मालमत्ता ही २७ कोटींची दाखविण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra issue will raised in delhi says p chidambaram
First published on: 01-06-2016 at 03:29 IST