विधिमंडळाच्या सभागृहात मोबाइलवर रमी खेळतानाच्या चित्रफितीमुळे अडचणीत आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपांचे खंडन केले. आपल्याला रमी खेळताच येत नाही, असा दावा करताना ‘ती मोबाइलवरील जाहिरात होती’ असे कोकाटे म्हणाले. मात्र, त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर थोड्यात वेळात आमदार रोहित पवार यांनी रमीत रममाण कोकाटेंची नवी चित्रफित प्रसारीत करून त्यांची आणखी पंचाईत केली.
बेताल आणि वादग्रस्त विधानांबद्दल आधीच टीकेचे लक्ष्य बनलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात बसून रमी खेळतानाच्या चित्रफितीमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढत असताना, मंगळवारी खुद्द कोकाटे यांनी राजीनाम्यास नकार दिला. ‘या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात निवेदन करावे. त्यात मी दोष आढळल्यास राजीनामा थेट राज्यपालांकडे सादर करेन,’ असे ते म्हणाले.
आपल्याला रमी हा खेळच खेळता येत नाही, रमीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खाते नोंदवावे लागते, माझा भ्रमणध्वनी तपासा अशी विधाने करत त्यांनी स्वत:चा बचाव केला. तसेच चित्रफित काढून प्रसारीत करणाऱ्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सभागृहात पत्ते खेळणे भूषणावह नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात, मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांवर विश्वास ठेवून हे विधान केलेले असू शकते, असे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.
कोकाटे यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा माणिकराव कोकाटे यांच्या दोन चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारीत केल्या आहेत. त्यात विधान परिषदेत आदिवासी विभागाच्या एका प्रश्नावर चर्चा सुरू असताना कोकाटे रमी खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सभागृह तहकूब झाल्यानंतर भ्रमणध्वनी पाहत असल्याचा कोकाटे यांचा दावा सपशेल खोटा ठरला.
‘विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेली ही चित्रफीत प्रसारीत करणे टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावे लागले. आता चौकशी करायचीच तर कृषिमंत्री पत्ते खेळत होते की, नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी पवार यांनी केली.
कुणाचा विनयभंग केला का ? या प्रकरणात राजीनाम्याचा विषय येतोच कुठे, राजीनामा देण्यासाठी कुणाचा विनयभंग केला का, असे प्रश्न मंत्री कोकाटे यांनी उपस्थित केले. आपल्या बदनामीमागे कोण आहे हे शोधून काढणार आहे. बदनामीमागे माध्यमातीलही काही लोक असू शकतात. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांचे सीडीआर तपासणार आहे, असेही ते म्हणाले.