मुंबई : दुबार नावे, एकाच पत्त्यावर शेकडो मतदार, अस्तित्वात नसलेल्या घरांत मतदार नोंद, मतदारांच्या वयांच्या तपशीलातील दोष अशा वेगवेगळ्या त्रुटी दाखवत राज्यातील विरोधी पक्षांनी बुधवारी निवडणूक आयोगाला घेरले. या मतदार याद्यांतील दोष आयोगाने स्वत:हून दूर करावेत आणि तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी महाविकास आघाडी आणि मनसेसह अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबत आयोगाकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर पुढील रणनीती ठरवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विरोधकांचा ‘वातावरणनिर्मितीचा प्रयत्न’ असल्याची टीका केली.

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी महायुती आणि निवडणूक आयोग या दोघांवरही निशाणा साधला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या भेटीत मांडलेल्या मुद्द्यांचा तपशील पत्रकार परिषदेत मांडण्यात आला. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार या महाविकास आघाडीच्या नेत्यांसह प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही उपस्थित होते.

‘लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपला निमंत्रण देऊनही त्यांचा एकही नेता आमच्याबरोबर आला नाही. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मतदार यांद्यामध्ये घोळ केला आहे. त्यांना हवे त्याचे नाव यादीत घालतात आणि नको त्याचे नाव काढून टाकतात. हा लोकशाहीचा खेळखंडोबा आहे,’ अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना काहीही अधिकार नाहीत. ते फक्त कळसूत्री बाहुल्या आहेत. कोणतेही प्रश्न विचारले तर हे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतात, असे सांगतानाच ‘मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी सदोष ‘मत’वधाचा गुन्हा आयोगावर दाखल करायला हवा’ अशी टिप्पणी उद्धव यांनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील त्रुटी पत्रकार परिषदेत दाखवल्या. तसेच या त्रुटी दूर करेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी आयोगाकडे केल्याचे सांगितले. मतदार याद्यांमधील गैरप्रकार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वप्रथम उजेडात आणल्याचे सांगताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘राजकीय हस्तक्षेपामुळे निष्पक्ष निवडणुका होत नाही’ अशी टीका केली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जयंत पाटील यांनी ‘लोकशाहीची थट्टा खपवून घेतली जाणार नाही’ असे सांगत ‘आमच्या सर्व शंकांचे निरसन आयोगाने करावे’ अशी अपेक्षा व्यक्त केली.

विरोधक गोंधळलेले – मुख्यमंत्री

राजकारणात आजपर्यंत एवढे गोंधळलेले विरोधक कधीही पाहिले नाहीत. मतदारयादीतील प्रश्नावरून पहिल्या दिवशी ते भलत्याच अधिकाऱ्यांना भेटले. हाच विषय घेऊन आज ते दुसऱ्या अधिकाऱ्यांना भेटले. निवडणुका जवळ आल्या, की वातावरण तयार करण्याचा भाग जास्त असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्यातील ही अपरिपक्वता, गोंधळ पाहूनच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बुधवारी त्यांच्याबरोबर जाणे टाळले असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला.