जेईई-अॅडव्हान्सच्या दुसऱ्या टप्प्याच्या परिक्षेत राज्याचा दुसरा क्रमांक
जेईई-मुख्य (मेन्स) या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेतून ‘जेईई-अॅडव्हान्स’ या दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेकरिता निवड झालेल्या २ लाख २० हजार विद्यार्थ्यांमध्ये यंदा उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी जेईई-मुख्यमधून सर्वाधिक विद्यार्थी पाठविण्यात उत्तर प्रदेशखालोखाल राजस्थान आघाडीवर होते. मात्र, यंदा ही जागा महाराष्ट्रने पटकावली आहे. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या नामांकित अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेमधील प्रवेशाकरिता जेईई-अॅडव्हान्स परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अॅडव्हान्सकरिता निवड झालेल्या १९ टक्के विद्यार्थिनींमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. त्या खालोखाल मुली तेलंगणातील आहेत. अर्थात शिक्षण मंडळांशी तुलना करता निवड झालेल्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’चे (सीबीएसई) आहेत. अर्थात इतर राज्यांच्या शिक्षण मंडळांचे विद्यार्थी यात आपले अस्तित्व दाखवू लागले आहेत. त्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे, अशी माहिती आयआयटीतील सूत्रांनी दिली. महाराष्ट्रच्या बाबतीत म्हणायचे तर मुंबई, पुणे, नागपूर आणि लातूर येथून मोठय़ा संख्येने विद्यार्थी जेईई मुख्य आणि अॅडव्हान्समध्ये उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. येथून निवड होणाऱ्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे.
जेईई-मुख्यमध्ये मोठय़ा संख्येने अॅडव्हान्सकरिता निवड झालेल्यांमध्ये बिहार गेल्या वर्षी चौथ्या स्थानावर होते. ते या वर्षी खाली घसरले आहे. तुलनेत केरळने यंदा चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी हे राज्य पहिल्या १५मध्येही नव्हते. ते यंदा नवव्या स्थानावर आहे. इतकेच नव्हे तर केरळ, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिण भागातील राज्यांतून अॅडव्हान्सकरिता निवड होणाऱ्यांची संख्या एकूणात ३५ टक्के आहे. त्यातही आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. २१ मे रोजी होणाऱ्या जेईई-अॅडव्हान्सकरिता या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागेल. अर्थात २ लाख २० हजारांमधून जे नोंदणी करतील त्यापैकी पहिले १ लाख ७४ हजार विद्यार्थीच जेईई-अॅडव्हान्स देतील.