मुंबई : गेले काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक भागात तापमानात वाढ होऊन उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. तर, काही भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित भागात मात्र पावसाची फारशी शक्यता नाही.

पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या काही भाग वगळता उकाडा आणि उन्हाचा सामना करावा लागत आहे. मधूनच ढगाळ वातावरण आणि मध्येच प्रखर ऊन यामुळे उकाडा आणि उन्हाचे चटकेदेखील सहन करावे लागत आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत मुसळधार पाऊस नसला तरी अधूनमधून बरसणाऱ्या हलक्या सरींमुळे दिलासा मिळाला. दरम्यान, राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आजपासून पुढील एक ते दोन दिवस विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतर भागात मात्र पावसाची उघडीप राहील.

कमी दाब क्षेत्र

दक्षिण पाकिस्तान आणि ईशान्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीची तीव्रता आता कमी होत आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या केंद्रापासून भूज, आग्रा, बारबांकी, वाराणसी, दाल्तोंगंज, रांची, दिघा, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून, तमिळनाडू ते मान्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

कमाल तापमानात वाढ

राज्यात पावसाने उघडीप दिल्यापासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात अनेक भागात कमाल तापमान ३० अंशापुढे नोंदले जात आहे. ही परिस्थिती साधारण अजून दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत असह्य उकाडा

गेल्या आठवड्यापासून मुंबईत पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे.तापमानातही मागील दोन – तीन दिवसांपासून वाढ झाली आहे. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्ण व दमट वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय

राज्यात रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर सलग काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची फारशी शक्यता नसेल. त्यानंतर रविवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल. मुंबईत पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील. तसेच दिवसा पश्चिमेकडून वारे वाहतील त्यामुळे दिवसाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. दरम्यान, रविवारपासून नैऋत्य मोसमी वारे पुन्हा जोर धरणार आहेत. तसेच वाऱ्यांची चक्रीय स्थिती असेल. त्यामुळे पाऊस सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईत पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.