मुंबई : राज्यात गत तीन – चार दिवसांपासून सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीची नोंद १७ जिल्ह्यांत झाली आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
राज्यात गत तीन – चार दिवसांपासून सर्वदूर पाऊस पडत आहे. एकूण १७ जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यापैकी बीड, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांत शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी बाधितांना आणि प्रामुख्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली. पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदार बजरंग सोनावणे, बाळ्या मामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते पाटील आदींनी शहा यांची भेट घेतली.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती अत्यंत भीषण आहे. स्थानिकांचा विरोध डावलून तेथील लेंडी प्रकल्पात पाणी साठवल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. सात – आठ नागरिकांचा तर पन्नासहून अधिक गाई-म्हशींचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने मदतकार्याचा वेग वाढवून तातडीने सर्वतोपरी मदत करावी. मुंबईप्रमाणेच ग्रामीण भागाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी केली आहे.
सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामांचा गौरव करण्याची मागणी
महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे काम व्यापक आहे. सहकार क्षेत्रात दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यासाठी सहकार मंत्रालयामार्फत राष्ट्रीय स्तरावर विशेष पुरस्कार सुरू करावा, अशी मागणीही सुळे यांनी शहा यांच्याकडे केली.