मुंबई : महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून ‘केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया’कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि ‘ केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया ’ दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर केंब्रिजच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण गटाचे व्यवस्थापकीय संचालक रॉड स्मिथ आणि शालेय शिक्षण विभागातर्फे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी स्वाक्षरी केली. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार आदी यावेळी उपस्थित होते.
या करारामुळे केंब्रिजचे कौशल्य आणि राज्यातील शिक्षण क्षेत्र एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवून देता येईल. केंब्रिज हे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे नाव असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतींमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सामंजस्य कराराविषयी :
हा सामंजस्य करार महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षकांच्या सतत व्यावसायिक विकासावर भर देणे आवश्यक आहे. राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देताना परिणामकारकता व गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य घेण्यात येणार आहे.
केंब्रिजकडे जागतिक दर्जाचे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, पाठ्यपुस्तके, डिजिटल सामग्री व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपलब्ध आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत केंब्रिज शिक्षकांसाठी विषयानुरूप प्रशिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुरूप आणि सीबीएसई-सुसंगत शैक्षणिक साधनसामग्री, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘क्लायमेट क्वेस्ट’ सारखा हवामान शिक्षण कार्यक्रम व पूर्व-प्राथमिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय डिजिटल साक्षरता, आयसीटी आधारित शिक्षण, जीवनकौशल्ये व मूल्यशिक्षणाशी संबधित अभ्यासक्रमही राज्यातील शाळामध्ये राबवले जातील.
या करारामुळे शिक्षकांच्या गुणवत्तेत वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामामध्ये सुधारणा होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पद्धतीचा लाभ ग्रामीण ते शहरी सर्व शाळांना मिळेल, हवामान शिक्षण व डिजिटल कौशल्यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सज्ज करता येईल. यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि महाराष्ट्राची शिक्षणव्यवस्था अधिक समावेशक, गुणवत्तापूर्ण व जागतिक मानकाशी अनुरूप बनेल.
राज्यातील शिक्षकांना केंब्रिज प्रेस आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षक विकास कार्यक्रम, सेल्टा व आयकेआय सारख्या जागतिक मान्यताप्राप्त पात्रता तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत के-१२ शैक्षणिक साधने उपलब्ध करून शिक्षक क्षमता वृद्धी, दर्जेदार अध्यापन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल. तसेच या कराराद्वारे महाराष्ट्र शासनाला राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल.
शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही जागतिक दर्जाचे संसाधन उपलब्ध होतील. शिक्षण प्रणालीत नवोन्मेष व गुणवत्ता येईल आणि राज्याच्या शिक्षणव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त होईल. हा करार महाराष्ट्रातील शाळांना ‘भविष्यकालीन, समावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण’ देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.