मुंबई : ‘जगाच्या सृजनशीलतेवर व सांस्कृतिकतेवर मोहिनी टाकण्याची ताकद मराठी चित्रपटांमध्ये आहे. मराठी चित्रपटसृष्टीमागे आम्ही सरकार म्हणून खंबीरपणे उभे आहोत आणि मराठी चित्रपटसृष्टीला कोणताही धोका पोहोचू देणार नाही. मी अमेरिकेतील नेटफ्लिक्सच्या कार्यालयात अलीकडेच जाऊन चर्चा केली आणि मराठी चित्रपट योग्य दरात घ्यावेच लागतील’, अशी सूचना दिली, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा वरळी येथील एनएससीआय डोम येथे सुरू आहे. याप्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मनोरंजनसृष्टीतील कलाकार व मान्यवर उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रसिद्ध कलाकारांच्या सादरीकरणाने सजलेला ‘रंगतरंग’ कार्यक्रमही सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले होते, तर प्रसाद ओक आणि अमृता सुभाष यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे.
‘सर्वच कलाकृती, कलाकार व तंत्रज्ञ उत्तम आहेत. त्यामुळे ६० व्या आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करताना कस लागला. सर्वसमावेशकता व गुणग्राहकतेचा संगम साधून विविध पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करण्यात आली’, असे ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.