मुसळधार पावसामुळे पुढच्या आठवडय़ातील पाच दिवसांची सुट्टी घरातच

पर्यटनासाठी वर्षांच्या सुट्टय़ा तपासून प्रवासाचे बेत आखणाऱ्या मुंबईकरांमुळे ऑगस्ट महिन्यातील सगळय़ा आठवडय़ाच्या अखेरीस पर्यटन स्थळांचे  बुकिंग्ज पुर्ण झाले होते. मात्र गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी निर्माण झालेली पुरसदृश परिस्थिती, महाडमधली सावित्री पूल दुर्घटना, दरड कोसळल्यामुळे लोणावळा, माळशेज, महाबळेश्वरसह बंद झालेली ठिकाणे याचा फटका पर्यटनाला बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेकांनी बेत रद्द केले असून पुढच्या आठवडय़ातील पाच दिवसांची मोठी सुट्टी पर्यटकांना घरातच बसून काढावी लागणार आहे.

या महिन्यात शनिवार, रविवार, सोमवारी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आणि बुधवारी पतेतीची सुट्टी अशा जोडून सुट्टय़ा आल्याने पर्यटकांनी जवळपासच्या माथेरान, महाबळेश्वर, चिखलदरा, भंडारदरा, माळशेज घाट इथे भेट देण्याचे बेत आखले होते. १६-१७ ऑगस्टपर्यंत एमटीडीसीच्या (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) रिसॉर्टसह अनेक छोटी-मोठी हॉटेल्सची बुकिंग्ज हाऊसफुल्ल झाली होती, पण गेल्या आठवडय़ात सुरक्षेच्या कारणास्तव लोणावळा-खंडाळा परिसर, माळशेज घाट पर्यटनासाठी बंद करण्यात आला. त्यामुळे कित्येकांना आपले बेत रद्द करावे लागले. एमटीडीसीनेही पर्यटकांना त्यांचे सर्व पैसे परत देण्याची व्यवस्था केली असून हे दोन आठवडे वगळता पावसाळी पर्यटनावर फार परिणाम होणार नाही, असा अंदाजही एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी व्यक्त केला.

पुणे, मुंबई आणि नाशिकमधील पर्यटक पावसाळ्यात कार्ला, लोणावळा, माळशेज घाट, महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा इथे गर्दी करतात. पण गेल्या आठवडय़ात झालेला पाऊस आणि दरड कोसळण्याच्या भीतीमुळे चिंता  आहे. परिणामी, काहींनी बुकिंग्ज रद्द के ली होती. तर काहींनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

– सतीश सोनी, सहव्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी

सततच्या पावसाचा देशांतर्गत पर्यटनावर काहीही परिणाम झालेला नाही. पावसाळ्यात अनेक ठिकाणी स्वत:च्या गाडय़ा घेऊन प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली असून अशांसाठी बेकल, हम्पीसारखी काही नवनवीन ठिकाणे उपलब्ध झाली आहेत. याशिवाय, डेहराडून, हृषीकेश, मणेसर आणि अलवार इथेही पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

– राजीव काळे, थॉमस कुक (इंडिया)चे भारताचे प्रमुख