लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ‘महारेरा’चे नवीन संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासाठी जुन्या संकेतस्थळावरील सर्व माहिती नवीन संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ‘महारेरा’ने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी सध्याचे संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन दिवसांमध्ये विकासक, तक्रारदार, दलाल वा नागरिकांना कोणतीही प्रक्रिया करता येणार नाही. त्यामुळे या कालावधीत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन या निमित्ताने ‘महारेरा’कडून करण्यात आले आहे.

विकासक, दलाल आणि तक्रारदार यांसह सर्व सामान्यांसाठी ‘महारेरा’चे संकेतस्थळ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नोंदणीपासून तक्रारीच्या निकालापर्यंतची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येते. त्यातच आता दोन दिवस ‘महारेरा’चे संकेतस्थळ बंद राहणार आहे. त्यामुळे विकासक ,दलाल, तक्रारदार, ग्राहक यांना थोडीशी अडचण सहन करावी लागणार आहे. जुन्या संकेतस्थळात अनेक बदल करून ‘महारेरा’ने नवीन संकेतस्थळ तयार केले आहे. ‘महाकृती’ नावाने हे संकेतस्थळ ओळखले जाणार आहे. नवीन संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे.

आणखी वाचा-उपकरप्राप्त इमारतींचे रखडलेले २२ पुनर्विकास प्रकल्प मार्गी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून आता जुन्या संकेतस्थळावरील विदा (डाटा) नवीन संकेतस्थळात समाविष्ट करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी जुने संकेतस्थळ बंद राहणार असल्याचे ‘महारेरा’कडून सांगण्यात आले आहे. या दोन दिवसामध्ये कोणतीही प्रक्रिया करता येणार नाही. त्यामुळे नागरिकानी सहकार्य करावे, असे आवाहन ‘महारेरा’ने केले आहे. रविवार, १ सप्टेंबर रोजी रात्री नवीन संकेतस्थळ कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून अद्ययावत अशा संकेतस्थळाद्वारे नागरिकांना एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, हे संकेतस्थळ कसे वापरायचे यासाठी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा फायदा, विकासक, दलाल, तक्रारदार आणि सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे.