scorecardresearch

मुंबई: एमएमआरडीए रोप-वेसाठी पुन्हा प्रयत्नशील महावीर नगर मेट्रो स्थानक; पॅगोडा रोप वे प्रकल्पासाठी नव्याने निविदा

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेतील महावीर मेट्रो स्थानक – पॅगोडादरम्यान रोप-वे बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.

mmrda
एमएमआरडीए (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेतील महावीर मेट्रो स्थानक – पॅगोडादरम्यान रोप-वे बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प मार्गी लागत नव्हता. आता पुन्हा एकदा एमएमआरडीएने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या ७.२ किमी लांबीच्या रोप-वेसाठी नव्याने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत.

हेही वाचा >>>माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवले; जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिकेची कारवाई

मेट्रोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी, मेट्रो आणखी एका वाहतूक सेवेशी जोडण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यटनाला चालना देण्यासाठी एमएमआरडीएने रोप – वे प्रकल्प हाती घेतला आहे. बोरिवली – गोराई दरम्यान ८ किमी लांबीचा आणि मालाड – मार्वे दरम्यान ४.५ किमी लांबीचा रोप – वे मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या मे. इंडियन पोर्ट रेल आणि रोप – वे कॉर्पोरेशन लिमिटेडची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मे. इंडियन पोर्ट रेलने २०१९ मध्ये चारकोप मार्वे आणि महावीर नगर मेट्रो स्थानक ते पॅगोडा, गोराई असे दोन नवीन रोप – वे मार्ग सुचवून या मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएला सादर केला. या अहवालानुसार या दोन मार्गांवर रोप – वे बांधण्याचे निश्चित करण्यात आले आणि महावीर नगर मेट्रो स्थानक – पॅगोडा दरम्यान ७.२ किमी लांबीचा रोप – वे उभारण्यासाठी निविदा मागविल्या. मात्र निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्प रखडला. मात्र त्यानंतर निविदेला प्रतिसाद मिळाला, पण तांत्रिक अडचणीमुळे निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढावली. यामुळे पुन्हा प्रकल्प रेंगाळला.

हेही वाचा >>>माहीमच्या समुद्रातील बांधकामावरच्या कारवाईवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; संदीप देशपांडे म्हणतात, “एवढी मोठी गोष्ट घडत असताना…!”

रेंगाळलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने पुन्हा निविदा मागविल्या आहेत. महावीर नगर मेट्रो स्थानक – पॅगोडा दरम्यानच्या रोप – वेचा पुन्हा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी ही निविदा मागविण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:58 IST

संबंधित बातम्या