मुंबई : महावितरणने घरगुती व अन्य वीजग्राहकांचे वीजदर किरकोळ कमी केले असले, तरी प्रत्यक्षात दरमहा १०० युनिटहून अधिक वीजवापर असलेल्या एकूण ग्राहकांपैकी ३० टक्क्यांच्या आसपास मध्यमवर्गीय घरगुती ग्राहकांचे वीजदर औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांपेक्षाही अधिक आहेत. उद्योगांचे वीजदर आणखी कमी करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव असल्याने ‘कृषी’च्या ‘क्रॉस सबसिडी’चा मोठा बोजा ३० टक्के घरगुती ग्राहकांवर लादण्यात आला आहे.

बहुसंख्य मध्यमवर्गीय घरगुती ग्राहकांच्या घरात दिवे, पंखे, टीव्ही, फ्रीज, गिझर, ओव्हन, वातानुकूलन यंत्र, संगणक किंवा लॅपटॉप अशा किमान गरजेच्या वस्तू असतात. या ग्राहकांचा उन्हाळ्यात किंवा एरवीही दरमहा २५०-५०० युनिट किंवा त्याहून अधिक वीजवापर होतो. महावितरणने १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजदर १ जुलैपासून ८.१४ वरून ७.३१ रुपयांपर्यंत कमी केले.

आतापर्यंत पहिल्यांदाच वीजदर कमी झाले असून, या ग्राहकांची संख्या ७० टक्के असल्याने घरगुती ग्राहकांना मोठा लाभ दिल्याचे श्रेय महायुती सरकार घेत आहे. परंतु उर्वरित ३० टक्के म्हणजे मध्यमवर्गीय ग्राहकांना उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांपेक्षाही महागडी वीज पुरविली जात असल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे.

वीजपुरवठ्याचा दर (कॉस्ट ऑफ सप्लाय) ७-८ रुपये प्रतियुनिट असताना कृषी ग्राहकांना स्वस्तात वीज पुरविली जाते. त्यामुळे थकबाकीपैकी मोठा आर्थिक बोजा केवळ ३० टक्के घरगुती ग्राहकांवर येत आहे. भाजपचे मध्यमवर्गीय मतदाराकडे अधिक लक्ष असते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खाते असूनही घरगुती ग्राहक मात्र महागड्या वीजेमुळे भरडला जात असल्याचा आरोप होत आहे.

औद्योगिक वीजजोडण्या घेण्याची नामुष्की

– राज्य वीज नियामक आयोगापुढे महावितरणच्या वीजदर प्रस्तावावर जनसुनावणी होते आणि ‘प्रयास’सारख्या अनेक अभ्यासू संस्था, नागरिक, घरगुती ग्राहक प्रतिनिधी बाजू मांडतात. परंतु घरगुती ग्राहकांचे वीजदर वाढतच चालले आहेत.

– पूर्वी उद्योगांपेक्षा घरगुती वीज स्वस्त असल्याने घरी छोटे-मोठे उद्योग करणाऱ्यांचा कल घरगुती वीजजोडण्या घेण्याकडे होता. मात्र आता घरगुती ग्राहकांचे वीजदर वाढल्याने काहीतरी उद्योग सुरू करून औद्योगिक वीजजोडण्या घेण्याची वेळ घरगुती ग्राहकांवर आली आहे.

१ जुलै २०२५ पासूनचे वीजदर प्रतियुनिट रुपयांमध्ये

संवर्ग                         वीजदर (रु.)

औद्योगिक(एचटी)            १०.७८

औद्योगिक (एलटी)         १०.१३

वाणिज्यिक (एचटी)          १६.८३

वाणिज्यिक (एलटी)         १४.७४

घरगुती ग्राहक (दरमहा वापर युनिट) वीजदर (रु.)

१-१००                               ७.३१

१०१-३००                           १३.१७

३०१-५००                           १७.५६

५०० हून अधिक               १९.१५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरणच्या घरगुती ग्राहकांचे वीजदर उद्योग आणि वाणिज्यिकपेक्षा अधिक असल्याने आता नागरिकांनी घरगुती उद्योग-व्यवसाय सुरू करावेत आणि औद्योगिक जोडण्या घ्याव्यात. मध्यमवर्गीय घरगुती ग्राहकांना कोणी वाली नसल्याने त्यांची वीज सर्वाधिक महागडी आहे. उद्योग, व्यापारी व वाणिज्यिक ग्राहकांपेक्षा घरगुती ग्राहक अधिक श्रीमंत आहेत, असे महावितरणला वाटत असावे. – अशोक पेंडसे, वीज तज्ज्ञ