मुंबईत आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसला भुईसपाट करीत जनता पार्टीला सर्व जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर मुंबईत मोदीलाटेमुळे प्रथमच भाजपप्रणित महायुतीला निर्विवाद व संपूर्ण विजय प्राप्त झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचे खडे चारत गेल्या निवडणुकीच्या बरोबर उलटे चित्र मोदीलाटेमुळे मुंबईत पहायला मिळाले. गेल्यावेळी मुंबईत एकही जागा मिळवू न शकलेल्या भाजप-शिवसेनेने सहाही जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ताधारी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभूत केले आणि गेल्यावेळच्या पराभवाचे उट्टे काढले. मनसेने मुंबईत शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करूनही त्यांच्या विजयाचा मार्ग रोखता आला नाही.
मोदीलाटेत महायुतीच्या उमेदवारांनी केवळ निसटता विजय मिळविलेला नाही, तर किमान दीड-दोन लाखांच्या दणदणीत मताधिक्याने यश संपादन केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराला जनता कंटाळल्याने मोदी लाटेत मिळालेले घवघवीत यश भाजप-शिवसेनेला नवी उभारी देणारे ठरणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय ठेवला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचेही सहकार्य सर्वाना मिळेल, यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष दिले.
उत्तर मुंबईतील भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी आणि ईशान्य मुंबईतील उमेदवार किरीट सोमय्या यांचा विजय पहिल्यापासूनच निश्चित मानला जात होता. पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या शेट्टी यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे संजय निरूपम यांना पराभूत करून साडेचार लाखाहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. सोमय्या यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार संजय पाटील यांच्यापेक्षा अडीच लाखाहून अधिक मताधिक्य घेतले व विजय संपादन केला. या मतदारसंघात ‘आप’ ने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांना मतदारांनी झिडकारले आणि केवळ ६१ हजाराहून अधिक मते पदरात टाकली. प्रिया दत्त यांच्यासारख्या तगडय़ा उमेदवारापुढे हमखास पराभवाची शक्यता असल्याने  पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र पूनम महाजन विजयी झाल्या. प्रिया दत्त यांना गेल्यावेळेप्रमाणेही कामगिरी करता आली नाही. मोदी लाटेचा फायदा शिवसेनेलाही चांगलाच मिळाला. मनसेने शिवसेना लढवीत असलेल्या मतदारसंघात उमेदवार उभे करूनही मतविभाजन झाले नाही. मनसेला मत म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा, हा महायुतीने केलेला प्रचार मतदारांपर्यंत पोचला . दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मिलींद देवरा यांचे पारडे जड वाटत होते. मात्र मतदारांनी अरविंद सावंत यांना दीड लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून दिले. उत्तर-पश्चिम मतदारसंघात गुरूदास कामत हेही काँग्रेसचे तगडे उमेदवार होते, पण शिवसेनेचे गजानन कीर्तीकर हे तब्बल पावणेदोन लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून विजयी झाले. दक्षिण मध्य मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव करणे, शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना सहज शक्य होईल, असे चित्र सुरूवातीला नव्हते. पण मोदींच्या सभा आणि महायुतीने एकत्रितपणे घेतलेली मेहनत यामुळे मनसेच्या बालेकिल्ल्यातही सुमारे दीड लाखाचे मताधिक्य शेवाळे यांनी मिळविले.
२०
 सुनील तटकरे यांना अवघ्या दोन हजार मतांनी विजयाने चकवा दिला असताना या मतदारसंघात सुमारे २० हजार १२९ मतदारांनी ‘नोटा’चे (वरीलपैकी कोणीही नाही) बटण दाबल्याची आकडेवारी समोर आली आहे.

राखी सावंतला दोन हजार मते
‘आयटम गर्ल’ राखी सावंतला सुमारे दोन हजार मते मिळाली. पहिल्या फेरीत १२१ मतांनी सुरुवात केलेल्या राखी सावंतला अखेरच्या मतमोजणीनंतर एकूण १,९९७ मते मिळाली. मात्र ही मते पाहायला राखी  सावंत मतमोजणी केंद्रात फिरकली नाही. या विभागात तब्बल ११००९ मतदारांनी नोटाचा अधिकार बजावला.

मला विजयाची खात्री होती. परंतु, इतके मताधिक्य मिळेल असे वाटले नव्हते. त्यासाठी मी मतदारांचे आभार मानते. ही वेळ आपल्या मतपेढीवर डोळा ठेवून काम करण्याची नाही. विकास आणि चांगले प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न असेल.
 पूनम महाजन, भाजप,  उत्तर-मध्य मुंबई<br />                   

माझ्या यशात सर्वात मोठा वाटा मतदारांचा आहे. माझ्या या यशात राज ठाकरे यांचाही वाटा आहे. मी जिंकून येणारच होतो. पण, त्यांनी माझ्या मतदारसंघात त्यांचा उमेदवार न दिल्याने माझी आघाडी आणखी वाढली.
गोपाळ शेट्टी, भाजप, उत्तर मुंबई