मुंबई : मध्य मुंबईतील माहिम पश्चिम भागातून सोमवारच्या बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा शोध घेण्यात माहिम पोलिसांना यश आले आहे. मुलीच्या शोधासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाच्या मदतीने सहा तासांत मुलीचा शोध लावला. मुलगी सुखरूप असून धारावी परिसरात ती सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

माहिम पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी सकाळी सहा वर्षांची मुलगी दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती परत आलीच नाही. अखेर कुटुंबिय व नातेवाईकांनी तिचा विविध ठिकाणी शोध घेतला. पण ती कुठेच सापडली नाही. अखेर शेजाऱ्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार कुटुंबियांनी स्थानिक माहिम पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी तत्काळ ४ पथकांची स्थापन करून मुलीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर एक पथक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी करीत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर उर्वरित तीन पथके माहितीच्या आधारावर मुलीचा शोध घेत होते. त्यावेळी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी करताना बेपत्ता मुलगी धारावीच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी तात्काळ इतर पथकांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथकाने धारावी परिसरात शोध घेण्यात सुरूवात केली. तपासादरम्यान ९ जून रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास पोलिसांनी अल्पवयीन मुलगी धारावीतील मोठ्या मशीदेसमोर सापडली. चौकशी केली असता ती बेपत्ता झालेली मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला सुखरूप पोलीस ठाण्यात आणले. याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यानुसार कुटुंबिय पोलीस ठाण्यात दाखल झाले. मुलीचा ताबा तिच्या कुटुंबियांना देण्यात आला.