मुंबई : मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाचे आकर्षण दोन – तीन महिन्यातच कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसू लागले आहे. तब्बल २५ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यापासून गेल्या तीन महिन्यांत तेथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. एप्रिल महिन्यात तब्बल एक लाखांवर असलेली पर्यटकांची संख्या जून महिन्यात ४५ हजार होती.
दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील बहुचर्चित निसर्ग उन्नत मार्ग ३० मार्चपासून सुरू झाला. गेल्या तीन महिन्यांत या प्रकल्पाला सुमारे दोन लाख पर्यटकांनी भेट दिली. मुंबईच्या एका टोकाला असलेला मलबार हिल परिसर घनदाट झाडांसाठी व निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील हॅंगिंग गार्डन, म्हातारीचा बूट पर्यटकांसाठी खास आकर्षणाचा विषय आहे. निसर्ग उन्नत मार्गामुळे या आकर्षणात भर पडली आहे. सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या आश्चर्यकारकरित्या कमी होत आहे.
हा प्रकल्प महानगरपालिकेच्या डी विभागाअंतर्गत फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान या ठिकाणी जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आला आहे. निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ’सी व्हिविंग डेक’ बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत लाकडी फलाटाच्या उन्नत मार्गावर पर्यटकांना चालता येते. लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे. भक्कम पायाभरणीसह (पाईल फाऊंडेशन) पोलादी जोडणीचा आधारही या बांधकामाला देण्यात आला आहे. त्यासमवेत, आकर्षक अशा स्वरूपाची प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली (एक्सेस कंट्रोल सिस्टिम) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे, तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर आपत्कालीन मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. वनस्पतींमध्ये गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती शिरीष आदी प्रजातींचा समावेश आहे. पक्ष्यांमध्ये कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा / पोपट, हळद्या, नाचण / नाचरा / नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली आदी पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सरडा, झाडसरडे, भारतीय सुळेदार सरडा, नाग, अजगर, नानेटी आदींचा समावेश आहे.
दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक जास्त होते. तर जून महिन्यात पावसामुळे पर्यटकांची संख्या घसरल्याचे पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिना | पर्यटक | महसूल |
एप्रिल | ५१,५९७ | १३ लाख १० हजार |
मे | ५५,३१९ | १३ लाख ९६ हजार |
जून | ४५,५१५ | ११ लाख ४९ हजार |