मुंबई: बनावट सोनसाखळी खरी असल्याचे भासवून विक्रोळीमधील एका सराफाला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. वेळीच ही बाब सराफाच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
विक्रोळीच्या टागोर नगर परिसरात दीपक जैन यांचे ‘गुरूदेव ज्वलर्स’ नावाचे सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास एक इसम त्यांच्याकडे एक जुनी सोनसाखळी घेऊन आला. ही सोनसाखळी विकायची असल्याचे त्याने सराफाला सांगितले. आरोपीकडे या सोनसाखळीची पावती असल्याने सोनाराने तत्काळ ती तपासण्यासाठी ताब्यात घेतली. शेजारच्या दुसऱ्या दुकानात जाऊन त्याने सोनसाखळी तपासली असता ती बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका इसमाने एक सोनसाखळी या सराफाकडे आणली होती. त्यामुळे सराफाने यावेळी ही सोनसाखळी तपासली असता तीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याने तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.