scorecardresearch

३० कोटींचा व्यवहार दाखवून जीएसटीचा अपहार

शकुर खान(४८) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

मुंबई : तीस कोटी रुपयांचे कागदोपत्री व्यवहार दाखवून साडेपाच कोटी रुपयांची वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) अपहार केल्याप्रकरणी भिवंडीतून एका व्यावसायिकाला जीएसटी विभागाने अटक केली. आरोपी गेल्या साडेतीन वर्षांपासून अपहार करत होता. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने त्याने साडेपाच कोटी रुपयांचा आयात-निर्यात क्रेडिट (आयटीसी) अपहार केल्याचा संशय आहे.

मुन्नवर शकुर खान(४८) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तो भिवंडी येथील बंगलापुरा येथील रहिवासी आहे. खान हा मे. आदर्श स्क्रॅप ट्रेडर्स या कंपनीचा मालक आहे. त्याने कागदोपत्री व्यवहार दाखवून साडेपाच कोटी रुपयांचा जीएसटी अपहार केल्याचा आरोप आहे. श्री श्याम स्टील ट्रेडर्स या अस्तित्त्वात नसलेल्या कंपनीमार्फत भिवंडीतील आदर्श स्क्रॅप ट्रेडर्स या कंपनीने बनावट व्यवहार दाखवून आयटीसी घेतल्याची गुप्त माहिती रायगड जीएसटी विभागाकडून भिवंडीतील जीएसटी अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार याप्रकरणी डिसेंबर २०२१ पासून तपास सुरू होता. त्यात आरोपीने आदर्श स्क्रॅप ट्रेडर्स बनावट व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. तपासणीत आरोपीच्या कंपनीने व्यवहार केलेल्या १३ कंपन्या अस्तित्त्वातच नसल्याचे आढळले आहे. त्यांच्याबरोबर सुमारे ३० कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार दाखवले. त्यामार्फत पाच कोटी ५२ लाख रुपयांचा आयटीसी मिळवण्यात आला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man arrested over 5 crore gst fraud zws