लोकेश चंद्र (उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको)

विमानतळ, मेट्रो, नैना या प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या नियोजनात आणखी वाढ झाली असून ज्या उद्देशाने सिडकोची स्थापना करण्यात आली आहे तो सार्थ, सफल ठरणार आहे.

साठच्या दशकात मुंबईची वाढती लोकसंख्या आणि वाढता व्याप यावर उपाय म्हणून मार्च १९७० रोजी सिडकोची स्थापना करण्यात आली. सिडको ही शासनाची शंभर टक्के भांडवल असलेली कंपनी आहे. शहर नियोजनाचे सर्व अधिकार शासनाने सिडकोला दिल्याने, सिडकोला नवी मुंबईत सर्व कल्पना व संकल्पनांचा आविष्कार करता आला. सत्तरच्या दशकात ९५ गावांतील एक लाख १७ हजार लोकसंख्येचे आज वीस लाख लोकसंख्या आणि साडेसात लाख रोजगारांचे आंतरराष्ट्रीय शहर तयार झालेले आहे. येथील प्रत्येक नागरिकाला घर आणि घराजवळ रोजगार निर्माण करताना सिडकोने गेल्या ४९ वर्षांत प्रत्येक उत्पन्न गटातील नागरिकासाठी एक लाख ४० हजार घरांची उभारणी केलेली आहे. गेल्या वर्षी पंधरा हजार घरांची सोडत काढण्यात आली असून सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात ९० हजार घरांच्या महागृहनिर्मितीतील दहा हजार घरांची सोडत काढली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहणार आहेत. सुरुवातीच्या काळात सिडकोने रेल्वेबरोबर ६७ टक्के खर्चातील हिस्सा उचलून रेल्वे शहरात आणली. त्यामुळे ९० हजार घरांच्या निर्मितीसाठी रेल्वे स्थानके, बस आगार आणि ट्रक टर्मिनल्सचे भूखंड वापरले जाणार आहेत.

शहराच्या विकासाला गती देणारी दुसरी वाहतूक व्यवस्था म्हणजे मेट्रो. सिडकोने मे २०११ मध्ये बेलापूर ते पेंदार या मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे. पुढील महिन्यात या मेट्रोची चाचणी होऊन त्याच वर्षी ती धावूही लागेल. मेट्रोचे चार मार्ग सुरू केले जाणार असून चौथा मार्ग हा नवी मुंबई विमानतळाला जोडला जाणार असल्याने त्याची तूर्त अंमलबजावणी नाही. तळोजापुढे हा मार्ग कल्याणला जोडला जाणार असून त्याचा खर्च एमएमआरडीए करणार आहे. यात नैना क्षेत्राचा काही भाग येत असल्याने सिडको वीस टक्के खर्चाचा भार उचलणार आहे. महामुंबई क्षेत्रातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वेच्या पनवेल, कर्जत व सीएसटीपर्यंतचा एलेव्हेटेड प्रकल्पात सिडको सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. पनवेल रेल्वे टर्मिनसचे काम सध्या सुरू असून येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम मार्गी लागल्यानंतर हे काम पूर्ण होणार आहे. यामुळे दक्षिण भारतात ये-जा करणाऱ्या गाडय़ांना मुंबईबाहेर टर्मिनस मिळणार आहे. या व्यतिरिक्त पामबीच मार्गाची निर्मिती सिडकोने केलेली आहे. न्हावाशेवा-शिवडी सागरी मार्गापासून जवळपास एक हजार कोटी रुपये खर्चाचा सागरी मार्ग तयार केला जाणार असून तो नवीन विमानतळाला जोडला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे, मेट्रो, रस्ते वाहतुकीबरोबरच सिडको जलवाहतूकही उपलब्ध करणार असून नेरुळ येथे जेट्टीचे काम सुरू आहे. बीपीटी, मेरिटाइम बोर्ड, जेएनपीटी यांच्या बरोबरीने सिडको हे काम करीत असून १९९८-९९ मध्ये सुरू असलेली हॉवरक्राप्ट सेवा बेलापूर व वाशी येथून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत ही सेवा सुरू होईल. सीबीडी येथे या सेवेसाठी मरिना तयार करण्यात येत आहे. सिडकोने आतापर्यंत प्रदर्शन केंद्र, गोल्फ कोर्स, अर्बन हाट पूर्ण केलेले असून आता मुख्य प्रकल्पात विमानतळ, कॉर्पोरेट पार्क, लॉजिस्टिक हब आणि बेलापूर फोर्टची कामे सुरू आहेत. विमानतळ प्रकल्पात जमीन संपादन, उलवा नदीचा कालवा ही कामे झालेली आहेत. एका धावपट्टीची दिशा ऐनवेळी बदलल्याने त्याच्या आड येणाऱ्या टेकडीची उंची कमी करण्यास एक हजार ५०० कोटी खर्च येणार आहे. विमानतळाच्या आजूबाजूच्या जमिनीचा विचार करून २८० हेक्टर जमिनीवर एरोसिटी तयार केली जाणार आहे. खारघर येथील कॉर्पोरेट पार्कसाठी पारसिक टेकडीमधून तुर्भे ते खारघर हा एमएसआरडीसीच्या सहकार्याने आठ किलोमीटर लांबीचा पर्यायी मार्ग तयार केला जाणार आहे. जेएनपीटी परिसरात ६६० हेक्टर जमिनीवर लॉजिस्टिक हब तयार केले जाणार आहे. २२४ गावांजवळील ४७४ किलोमीटर क्षेत्रात ‘नैना’ प्रकल्प राबविला जात आहे. शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यास चाळीस टक्के जमीन अडीच एफएसआयसह मिळणार आहे. या जमिनीतील दहा टक्के जमीन विकून सिडको ग्रोथ सेंटर कोस्ट काढणार आहे. येथील पायाभूत सुविधांवर सिडको सात हजार ४०० कोटी रुपये खर्च करीत आहे. सहा टप्प्यांत येथील आराखडा तयार केला जात असून पुढील वर्षी डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष पायाभूत सुविधा दिसून येतील. या ठिकाणी ११५ कोटीची कामे सुरू आहेत. याच क्षेत्रातील ५३ किलोमीटर परिसरात मल्टी कॉरिडोअर जात आहे. त्यामुळे सर्व प्रकल्पाची ६१ हजार कोटी खर्चाची कामे होत आहेत. सिडकोने वाशी खाडीपूल, समृद्धी मार्ग, नाशिक मेट्रोला अर्थसाहाय्य केले आहे. विमानतळ, मेट्रो, नैना या प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या नियोजनात आणखी वाढ झाली असून ज्या उद्देशाने सिडकोची स्थापना करण्यात आली आहे तो सार्थ, सफल ठरणार आहे.

शब्दांकन : विकास महाडिक