मुंबई : केईएम रुग्णालयातील गलथान आणि ढिसाळ कारभारावरून मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालय प्रशासनाला सोमवारी धारेवर धरले. रुग्णालयामध्ये उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना केवळ नोंद करण्यासाठी दोन ते तीन तास ताटकळत राहावे लागत असल्याचे लोढा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच आठवडाभरामध्ये यामध्ये सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशााराही दिला. तसेच उपाययोजनांसंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असल्याचेही लोढा यांनी स्पष्ट केले.
लोढा यांनी सोमवारी केईएम रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचा ढिसाळ कारभाराचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. रुग्णांची नोंदणी करणारा विभाग अतिशय अरुंद असून, एकाच जागेवर हजारोंच्या संख्येने नाेंदणी केली जाते. तेथे पंख्यांचीही व्यवस्था नाही. नवी इमारत १३ मजल्यांची असून अनेकदा उद्वाहन बंद असते,अशा अवस्थेत रुग्णांना आम्हालाच संबंधित विभागात जावे लागत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
खासगी रक्त चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा आणि रुग्णालयातील डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लागेबांधे असून, बऱ्याच रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी खासगी प्रयाेगशाळेत पाठवण्यात येत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन, २ डी ईको, सोनोग्राफी या आवश्यक चाचण्यांसाठी रुग्णालयात तीन ते सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी असल्याचेही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. एमआरआयसाठी सध्या मार्च २०२६ पर्यंतची तर सीटीस्कॅनसाठी जानेवारी २०२६ पर्यंतचा प्रतीक्षा कालावधी सुरू आहे. सोनोग्राफीबाबत देखील हीच अवस्था असल्याचे लाेढा यांना पाहणीत दिसून आले.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात नोंदणी करण्यासाठी क्यू आर कोड आणि इतर संगणकीकरणाची यंत्रणा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने तब्बल ५५६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे, तरीही ही व्यवस्था सुरू होत नसल्याबद्दल लोढा यांनी संताप व्यक्त करून रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांना धारेवर धरले. ऑनलाईन प्रणाली वापरा
किंवा अन्य व्यवस्था निर्माण करा, पण रुग्णाच्या नोंदीसाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ खर्च होता कामा नये, असे लोढा यांनी बजावले. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने अडचणी येत असल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
