मोरांच्या अंडय़ांवर डल्ला, जैवविविधतेलाही धोका

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या राजभवनातील सापांचा बंदोबस्त करण्यासाठी आणण्यात आलेल्या मुंगूसांच्या उपद्रवाने येथील जैवविविधतेलाच धोका निर्माण झाला आहे. काही दशकांपूर्वी एक जोडी असलेल्या मुंगूसांची संख्या आता अगणित झाली असून त्यांच्या सुळसुळाटाने येथील व्यवस्थापक यंत्रणा हैराण झाली आहे. राजभवनाची शान असलेल्या मोरांच्या अंडय़ांवर तसेच पिल्लांवर ताव मारण्यासोबतच हे मुंगूस पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करत आहेत.

मलबार हिलच्या टेकडीवर सुमारे ५० एकरांवर पसरलेले राजभवन हे मोरांप्रमाणे मुंगूसांचे देखील अधिकृत निवासस्थान बनल्याचे चित्र दिसत आहे. भारतात साधारण मुंगूसांच्या सहा प्रजाती आढळतात. आखूड पाय, लांब शरीर आणि शरीराएवढीच लांब शेपूट असलेला हा प्राणी मांसाहारी आहे. त्यांचा आहारात पक्षी आणि त्यांची अंडी-पिल्ले, साप, पाली, खेकडे, माशांचा प्रामुख्याने समावेश असतो. हे प्राणी जोडीनेच राहणे पसंत करतात. १९९७ साली ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तर्फे(बीएनएचएस) राजभवनाच्या हरित पट्टय़ामध्ये आढळणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यात आला होता. त्या वेळी तयार करण्यात आलेल्या संशोधन पुस्तिकेत राजभवनातील मुंगूसांच्या वाढत्या लोकसंख्येचा उल्लेख आढळतो.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या झपाटय़ाने वाढल्याची माहिती राजभवनाच्या प्रवक्त्यांनी दिली. ‘बीएनएचएस’चे संशोधन होण्यापूर्वी सापांचे प्रमाण वाढल्याच्या अंदाजाने जुन्या अधिकाऱ्यांनी मुंगूसाच्या जोडीला राजभवन परिसरात सोडले होते. मात्र कालातंराने मुंगूसांनी सापांचा नायनाट करून आपली वंशावळ वाढविल्याची माहिती राजभवनातील अधिकाऱ्याने दिली. सापांनंतर या प्राण्यांनी आवारात बसणाऱ्या कावळे-कबुतरांवर झेप मारत त्यांची शिकार करण्यास सुरुवात केली. तसेच लांडोरांची अंडी आणि पिल्ले फस्त करत त्यावर आपली गुजराण सुरू ठेवल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. मुंगूसांमुळे राजभवनातील जैविक अन्नसाखळीचे गणितच बिघडल्याचे मत प्राणी अभ्यासकांनी मांडले आहे.

गेल्या काही दशकांमध्ये मुंगूस या प्राण्याने इतर वन्यजीवांप्रमाणे शहरी अधिवासात गुजराण करण्याचा गुणधर्म विकसित केल्याची माहिती प्राणीअभ्यासक विजय अवसरे यांनी दिली. म्हणजे के वळ सापावर अवलंबून न राहता मुंगूस उंदीर तसेच घुशींचीही शिकार करत असल्याचे ते म्हणाले. तसेच मुंगूसांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांचा भक्षकच राजभवन परिसरात नसल्याने तेथील त्यांची संख्या वाढल्याची शक्यता अवसरे यांनी वर्तवली.

राणीच्या बागेतही शिरकाव

राजभवनाप्रमाणे भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पिंजऱ्याबाहेर फेरफटका मारणाऱ्या मुंगूसांचे दर्शन पर्यटकांना सहजपणे घडते. रिकामी पिंजऱ्यात किंवा अस्वलाच्या रिकामी गुहेत हे प्राणी पर्यटकांना दिसतात. मात्र या ठिकाणी शिकारीच्या तंत्राऐवजी पिंजऱ्यात बंद असलेल्या प्राण्यांसाठी टाकलेल्या खाद्यावरच मुंगूस डल्ला मारत असल्याचे निदर्शनास आले आहे. बऱ्याचदा पिंजऱ्यातील प्राणीदेखील आपले खाद्य मुंगूसांबरोबर वाटून खात असल्याचे निरीक्षण अनेक  पर्यटकांनी नोंदविले आहे. त्यामुळे सहजखाद्य मिळत असल्याने या ठिकाणीदेखील मुंगूसांचा मोठय़ा प्रमाणात वावर आहे.