केंद्रीय प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजाकरिता काही तरी भरीव करू इच्छिणाऱ्या तरुणींना यशाचा मंत्र देण्यासाठी यंदाच्या ‘व्हिवा लाऊंज’मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर-म्हैसकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. २९ मार्चला प्रभादेवी येथील ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’च्या मिनी थिएटरमध्ये दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी हा कार्यक्रम सादर होणार आहे.
‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांची जडणघडण आणि त्यांचा प्रवास याची ओळख होते. आत्तापर्यंत या लाऊंजच्या माध्यमातून ख्यातनाम अभिनेत्री सोनाली बेंद्रे, आर जे मलिष्का, नेमबाज अंजली वेदपाठक, पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर, चित्रपट दिग्दर्शिका गौरी शिंदे, संगीतकार स्नेहा खानवलकर, सुप्रिया सुळे, आरती अंकलीकर-टिकेकर अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधला.
प्रशासकीय सेवांमध्ये मनीषा म्हैसकर या राज्यातील एक आघाडीच्या व कर्तबगार आयएएस अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. त्या १९९२च्या बॅचच्या आयएएस असून पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद स्वीकारण्याआधी त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक म्हणून काम केले आहे.
वर्धा व सांगली जिल्ह्य़ात अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी पदांची जबाबदारी म्हैसकर यांनी बजावली आहे. या ठिकाणी कार्यरत असताना पाणीटंचाईचा प्रश्न त्यांनी प्रभावीपणे हाताळला होता. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणि जलसंधारणाद्वारे शेती व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी त्यांनी राबविलेल्या जलदा, संपदा आणि वसुंधरा या उपक्रमांचे कौतुक झाले. कर्मचारी आणि लोकांचा सहभाग या दोन्हीच्या बळावर दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यात त्यांना यश आले होते.
मनीषा म्हैसकर यांच्याशी गप्पांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख आपल्याला होणार आहे. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव, व्यक्तिगत जीवनाचे अनेक पैलू या निमित्ताने ‘व्हिवा लाऊंज’मध्ये उलगडले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय सेवेत स्वत:ला सिद्ध करू पाहणाऱ्यांना मार्गदर्शनही मिळणार आहे.
‘व्हिवा सेलिब्रिटी गेस्ट एडिटर’ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मनीषा म्हैसकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत.
कार्यक्रमाचा तपशील
दिनांक – २९ मार्च, २०१३
स्थळ – पु.ल.देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी
वेळ – दुपारी साडे तीन वाजता
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘व्हिवा लाऊंज’मध्ये मनीषा म्हैसकर
केंद्रीय प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजाकरिता काही तरी भरीव करू इच्छिणाऱ्या तरुणींना यशाचा मंत्र देण्यासाठी यंदाच्या ‘व्हिवा लाऊंज’मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर-म्हैसकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

First published on: 26-03-2013 at 04:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manisha mhaiskar in viva lounge on 29 march