काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगेंच्या मागणीवर सडकून टीका केली. “पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर मनोज जरांगे हिरो झाले आणि आता ते सरकारला धमक्या देतात,” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. याला मनोज जरांगेंनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं.

मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही हिरो झालो नाही. आम्ही स्वतःला हिरो मानतही नाही. म्हणूनच मराठ्यांनी आम्हाला स्वीकारलं. त्यांनी त्यांचे शब्द आठवावेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील लोकांनी आम्हाला मोडायचं ठरवलं होतं. विरोधी पक्ष आमच्या बाजूने आवाज उठवत नव्हता. आमच्या आयाबहिणींची डोकी फोडली. त्यामुळे आम्ही हिरो झालो नव्हतो, तर आमचं आंदोलन संपवलं होतं. त्या दोघा-तिघांना आमचं आंदोलन संपवायचं होतं.”

“मराठा समाज त्या ५-६ जणांना पूर्णपणे ओळखून चुकला आहे”

“हिरोसारखे फालतू शब्द बोलायचे आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. ते त्यांची उभी हयात मराठा समाजात संभ्रम निर्माण करू शकणार नाहीत. ते तर सोडा, त्यांची पुढची पिढीही आता मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू शकणार नाही. कारण मराठा समाज त्या ५-६ जणांना पूर्णपणे ओळखून चुकला आहे,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर…”; मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते?

विजय वडेट्टीवार म्हणाले, “गोळीबारानंतर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे हिरो म्हणून पुढे आले. त्यानंतर त्यांना समाजाचं सगळं पाठबळ मिळालं आणि ‘हम छुका सकते हैं’ असा गर्व झाला. त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात. इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ. कसे रस्त्यावर फिरतात ते बघू, अशा आम्हाला धमक्या देतात.”

“मराठा तरुणांचं फार मोठं नुकसान होणार आहे”

ओबीसी आरक्षणापेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा अधिक फायदा होईल असं सांगताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “खुल्या प्रवर्गात फार जाती शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा किंवा सवलतीचा जिथं संदर्भ येतो तेथे मराठा तरुणांचं फार मोठं नुकसान होणार आहे. अशास्थितीत मराठा तरूणांनी अभ्यास करून हित काय याचा विचार करावा.”

हेही वाचा : “जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मराठा नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी”

“या प्रश्नावर मी मराठा नेत्यांच्या भूमिकेवर बोलण्याची गरज नाही. त्यांनी मराठा तरुणांना कशात हीत आहे, काय चांगलं आहे याबाबतची भूमिका स्पष्ट करावी,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.