मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येत आहे. शनिवारी जहांगिर कला दालनामध्ये मराठा समाजाच्या आंदोलक मोठ्या संख्येने शिरल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र कुणाचेही प्रदर्शन रद्द करण्यात आलेले नाही. सोमवारी साधना कदम यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन झाले मात्र दिवसभर प्रवेशद्वार अर्धवट उघडे ठेवून निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला होता.

दक्षिण मुंबईच्या कालाघोडा परिसरात सुप्रसिध्द जहांगिर कला दालन (आर्ट गॅलरी) आहे. या कलादालनात एकूण ४ सभागृह (हॉल्स) असून ते विविध कला माध्यमांसाठी वापरले जातात. या कलादालनात विविध कलावंत, चित्रकारांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. येथे सर्वांना प्रवेश मोफत आहे. शुक्रवार पासून मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. शनिवारी जहांगीर कलादालनात मराठा आंदोलक शिरले होते. त्यामुळे गोंधळ उडाला आणि तात्पुरते प्रदर्शन थांबविण्यात आले होते.

प्रदर्शन सुरू, प्रवेशद्वार अर्धे उघडे

या आंदोलनाचे पडसाद सोमवारी देखील पहायला मिळाले. सोमवारी कलादालनात साधना कदम यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घघाटन झाले. यावेळी कलांवत आणि मोजके पाहुणे उपस्थित होते. शनिवारी आंदोलकांनी घुसखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेशद्वार (शटर) अर्धे उघडे ठेवण्यात आले. जे निमंत्रित आणि कलावंतांचे परिचित आहेत त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. कुठलेही प्रदर्शन रद्द करण्यात आलेले नाही. फक्त प्रवेशद्वार अर्धेवट उघडे ठेवून परिचित आणि निमंत्रितांना प्रवेश दिला जातोय, असे कलादालनाच्या व्यवस्थापनाने सांगितले. सोमवारी काहीच अनुचित प्रकार घडला नाही किंवा कुणीही आंदोलक आले नव्हते, असेही व्यवस्थापनाने सांगितले. मंगळवारी प्रदर्शन कसे खुले ठेवायचे ते कलावंत सांगतील त्यानुसार केले जाईल, असेही व्यवस्थापनाने सांगितले.

त्यांनी कलादालन पाहिले…

मराठा आंदोलकांनी कलादालनाने प्रदर्शन उधळून लावले असा जो आरोप करण्यात येतो तो खोटा आहे असे खुद्द कलावंतांनी सांगितले. कला ही माणसांना जोडते. ती भेद करत नाही. शनिवारी कलादालनात आलेली माणसे ही ग्रामीण भागातील होती. त्यांनी पहिल्यांदा असे प्रदर्शन पाहिले. दालनातील गारव्यामुळे ती विश्रांतीसाठी विसावली. परंतु त्यांच्या बसण्याची पध्दत आणि ग्रामीण पेहरावामुळे काहींना ती घुसखोरी वाटली असे प्रसिध्द चित्रकार सुभाष गोंधळे यांनी सांगितले. आंदोलक आले त्यांनी चित्रे पाहिली आणि आनंद घेतला असे मला वाटते, असेही ते म्हणाले. जहांगिर कला दालनात सर्वांना मोफत प्रवेश आहे. मग पेहरावावरून त्यांना प्रवेश नाकारणार का? असाही प्रश्नही गोंधळे यांनी उपस्थित केला.

शनिवारी नेमके काय घडले?

शनिवारी मराठा आंदोलक सर्वत्र फिरत होते. ५० ते ६० आंदोलक फिरत कलादालनात आले. मात्र ते तोडफोड करतील अशी भीती व्यवस्थापनाला वाटली. त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. ते जात नसल्याने कलादालनातील दिवे आणि वातानुकूलीत यंत्रणा बंद करण्यात आली. सुमारे २० मिनिटे आंदोलक या कलादालनात होते, असे व्यव्यस्थापनाने सांगितले.