आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून आसावरी जोशीला ओळखले जाते. मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकांमध्ये आसावरीने तिच्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. मराठीसह हिंदी सिनसृष्टी गाजवल्यानंतर आता आसावरी जोशी राजकीय कारकिर्द गाजवण्यास सज्ज झाल्या आहेत. नुकतंच आसावरी जोशींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे कारणही स्पष्ट केले.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आसावरी जोशींनी भाजपला चांगलाच टोला लगावला.

आसावरी जोशी नेमकं काय म्हणाल्या?

“माझी नियुक्ती राष्ट्रप्रदेश उपाध्यक्ष चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह पक्षातील इतर सर्वांचे आभार मानते. मी सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देते. तुम्हा सर्वांना हे वर्ष आनंदाचे, सुख समाधानाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी आणि जीवनावश्यक वस्तू योग्य दरात मिळण्याचे जाऊ दे, अशी अपेक्षा व्यक्त करते.”

“मी कलाकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर कोणताही कलाकारांसाठी झटणारा पक्ष माझ्या नजरेत दुसरा कोणताही नाही. म्हाडाच्या सोडतीत कलाकारांसाठी कोटा, मराठी चित्रपटाला उद्योजकाचा दर्जा देण्याची गोष्ट किंवा लोककलावंत इतर कलावंत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ देण्यासंदर्भातील सर्व कलाकारांचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातात. या समस्यांवर उत्तर शोधली जातात आणि यासाठी झटणारा राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे म्हणूनच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.”

“माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी टाकली आहे ती मी नक्की पूर्ण करेन. पण जरी मी राजकारणात आली असली तरी राजकारण न करता काम करेन”, असे आसावरी जोशी म्हणाल्या.

‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार की नाही? स्टार प्रवाहने दिले स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आसावरी जोशींनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमधून अभिनय केला आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत त्या झळकताना दिसत आहेत. ‘स्वाभिमान’ मालिकेत आसावरी या अदिती सूर्यवंशी ही भूमिका साकारत आहे. अदिती सूर्यवंशी या एक प्रोफेसर असून त्यांची मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.