डिजिटल चित्रपटनिर्मितीतले धोके उलगडून दाखवणाऱ्या ‘अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स’च्या (ऑस्कर) ‘डिजिटल डिलेमा’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच ऑस्करशी मराठीचा अधिकृत संबंध प्रस्थापित झाला आहे.
अॅकॅडमीच्या संशोधनातून साकारलेले हे पुस्तक हिंदी आणि मराठी भाषेत प्रकाशित व्हावे, असा करार भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि अॅकॅडमी यांच्यात झाला होता. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारामुळे मराठी अनुवादित पुस्तकासाठी अॅकॅडमीशी पहिल्यांदा करार करण्यात आला असून २२ ऑक्टोबर २०१३ ला अॅकॅडमीच्या सदस्यांच्या उपस्थितीत हे ई-पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे समन्वयक आणि पुस्तकाचे अनुवादक डॉ. उज्वल निरगुडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
डॉ. उज्वल निरगुडकर हे ‘सोसायटी ऑफ मोशन पिक्चर्स टेलीव्हिजन अँड इंजिनिअरिंग’ या संस्थेच्या भारतीय विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अॅकॅडमीच्या सदस्यांबरोबर एकत्र काम केले असून ते या प्रकल्पाचे समन्वयक आहेत.
सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हिंदीच्या आधी मराठी अनुवादित पुस्तक प्रकाशित झाल्याचे निरगुडकर यांनी सांगितले.

‘डिजिटल डिलेमा’ विषयी..
फिल्मवरचे चित्रिकरण वर्षांनुवर्ष जपून ठेवता येते. आमच्याकडे शंभर वर्ष जुने चित्रपट अजून जसेच्या तसे संग्रहित करून ठेवलेले आहेत. या चित्रपटांचे जतन करणे ही कमी खर्चिक आणि तुलनेने सोपी गोष्ट आहे. पण, डिजिटल चित्रपटनिर्मितीचा खर्च जास्त असतो. त्यामुळे विविध देशांत जाऊन तेथील सरकारी यंत्रणांना आणि चित्रपटकर्मीना हे समजावून सांगण्याचे काम आम्ही ‘डिजिटल डिलेमा’च्या माध्यमातून करत आहोत 
 -अँडी माल्ट्झ, पुस्तकाचे मूळ लेखक.