मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा नायक म्हणून ख्याती असलेले, अष्टपैलू, हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ३० जानेवारीलाच त्यांचा ९३ वा वाढदिवस साजरा झाला होता. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत गुरूवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी चित्रपटांचा देखणा नायक, जरब बसवणारा खलनायक, हिंदीतही कधी धडाकेबाज इन्स्पेक्टर वा प्रेमळ डॉक्टर अशा नानाविध छटा असलेल्या लहान, मोठ्या भूमिकांमधून त्यांनी आपली छाप उमटवली होती.

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. स्वभावाने प्रेमळ मात्र कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तीचा अभिनेता म्हणून त्यांची ख्याती होती. रुप आणि अभिनयाच्या जोरावर नाटक, मराठी…हिंदी चित्रपटातून यशस्वी ठरलेल्या रमेश देव यांची पडद्यामागील ओळख ‘देव’माणूस अशीच होती.

पाच ते सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत रमेश देव यांनी २८५ हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. काळानुसार स्वत:मध्ये बदल घडवत दूरचित्रवाणीचे माध्यमही त्यांनी आपलेसे केले. टीव्ही मालिका, चित्रपट निर्मितीतही ते अग्रेसर राहिले. रमेश देव आणि सीमा देव यांनी ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्रित काम केले होते. या चित्रपटानंतर रमेश देव आणि सीमा देव हे जोडपे कलाकार म्हणून इतके लोकप्रिय झाले की ते दोघे चित्रपटात असतील तर चित्रपट हिट होणार हे समीकरण झाले होते. हेच समीकरण हिंदीतही होते. त्यांनी ‘सुवासिनी’, ‘वरदक्षिणा’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘आलिया भोगासी’ , ‘राम राम पाव्हणं’, ‘एक धागा सुखाचा’, ‘साता जन्माचे सोबती’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. ‘आरती’ हा १९६२ साली प्रदर्शित झालेला चित्रपट त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या.

देखणा चेहरा आहे म्हणून केवळ नायकाच्याच भूमिका करायच्या असा संकुचित विचार न करता खलनायकही त्यांनी त्याच तडफेने रंगवला. त्यांनी ‘भिंगरी’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. किंबहूना खलनायकही देखणा असू शकतो हे रमेश देव यांनी आपल्या खलनायकी भूमिकांमधून सिद्ध केले़ चरित्र भूमिकांमधूनही ते लोकप्रिय ठरले. हिंदीत अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा अशा कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. ते राजकारणातही सक्रिय होते. सोलापूर येथे झालेल्या ८८ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांची दोन्ही मुले र्अंजक्य देव आणि अभिनय देव चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.

अ ल्प च रि त्र…

मराठी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीचा काळ ते अगदी अलिकडे २०१३ पर्यंत अभिनेता म्हणून कार्यरत असलेल्या रमेश देव यांनी नव्वदी पार केली होती, तरी त्यांचा मुळचा हसरा…खेळकर स्वभाव कायम होता. रमेश देव यांचा जन्म अमरावतीचा, मात्र त्यांचे घराणे हे मूळचे राजस्थानमधील जोधपूरचे होते. त्यांचे कुटुंब नंतर कोल्हापूरात स्थायिक झाले. अभिनयाचे वेड त्यांना लहानपणापासूनच होते, विविध स्टुडिओत फिरून तेथील काम ते पहात असायचे. १९५१ साली आलेल्या ‘पाटलाची पोर’ या चित्रपटातून त्यांनी पहिली छोटेखानी भूमिका केली होती. राजा परांजपे हे त्यांचे गुरू. परांजपे यांनीच त्यांच्यातील अभिनेत्याला संधी दिली, मार्गदर्शन केले, रमेश देव आणि सीमी देव ही जोडी पडद्यावरही यशस्वीपणे उभी राहिली याचे श्रेय ते राजा परांजपे यांनाच देत असत. राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मागतो एक डोळा’ या १९५६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. त्यानंतर त्यांनी ‘देवघर’, ‘उमज पडेल तर’, ‘पैशाचा पाऊस’ अशा चित्रपटातून भूमिका केल्या. याच काळात मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री नलिनी सराफ नावाची तरुणी लक्ष वेधून घेत होती. चित्रपटासाठी म्हणून त्यांनी आपले नाव सीमा असे ठेवले होते. अभिनयाच्या क्षेत्रात सुरूवातीलाच एकत्र आलेले हे दोन तरुण कलाकार विवाहबंधनात अडकले आणि ही जोडी पुढे रमेश…सीमा देव म्हणून पडद्यावर आणि पडद्यामागेही लोकप्रिय ठरली. मराठीतील यशाच्या बळावरच रमेश देव यांनी हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. ह्रषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ चित्रपटातील त्यांचा डॉक्टर रसिकांच्या कायम स्मरणात राहील.

आ द रां ज ली

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. उद्धव ठाकरे</strong>, मुख्यमंत्री

मराठी मनोरंजनविश्वात होऊन गेलेल्या काही देखण्या नटांपैकी एक म्हणजे रमेश देव. अत्यंत उमदा माणूस. मी शाळेत असताना त्यांना पाहिले होते. पुढे मी नाटक करू लागलो तेव्हा त्यांच्याशी जवळून परिचय आला. माझ्या जवळपास सर्व नाट्यकृती त्यांनी पहिल्या आहेत. मराठी आणि हिंदी मधला ‘स्टार’ कलाकार असतानाही ते रंगभूमीवर (नाटकात) काम करत होते, हे त्यांचे मोठेपण. मराठी नाटक, चित्रपट याविषयी त्यांना प्रचंड आस्था होती. सतत वेगळे विषय आणि वेगळ्या कल्पना हाताळत त्यांनी मनोरंजनसृष्टी अधिकच सशक्त केली.  -जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक

कोणत्याही व्यसनाशिवाय मनोरंजन सृष्टीत अविरत काम करणे हा त्यांनी घालून दिलेला सर्वात मोठा आदर्श म्हणता येईल. त्यांचे काम पाहत आम्ही मोठे झालो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. त्यांच्या कुटुंबाशी माझे निकटचे संबंध असून मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे.   -विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

‘माहेरची साडी’च्या निमित्ताने आमची ओळख झाली परंतु पुढे त्यांच्या निर्मिती संस्थेतून मी बरेच काम केले. निर्मिती करताना समूहातल्या प्रत्येकाची ते काळजी घ्यायचे. विशेष म्हणजे प्रत्येक काम करताना उत्साहाचा असा झरा वाहत असायचा. वेळेवर येणे, संवाद चोख पाठ असणे असे कितीतरी गुण त्यांच्याकडून आम्ही आत्मसात केले आहेत. भूमिकेला न्याय देणे म्हणजे काय ते त्यांच्या चित्रपटातून सहज दिसते. इतकी वर्षे मनोरंजनक्षेत्रात काम करूनही त्यांना कसलेही व्यसन नव्हते आणि कामविषयी अहंभाव नव्हता. प्रत्येकाला ते माया लावत असे.   -अलका कुबल, ज्येष्ठ अभिनेत्री 

आपल्यापेक्षा वयाने कोणीही लहान असो वा मोठा, ते प्रत्येकाला ‘अरे मित्रा’ अशी प्रेमळ हाक द्यायचे. त्यांच्यासोबत मी तीन चित्रपट केले पण त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कधीही मी पणा जाणवला नाही. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीला भुरळ घालणारे रमेश देव हेच का असा प्रश्न त्यांच्यासोबत काम करताना पडायचा. चिरतरुण ही संकल्पना केवळ ऐकून माहीत होती, पण प्रत्यक्षात चिरतरुण म्हणजे काय हे रमेश देव यांना पाहून उमगले. वयाच्या नव्वदीत त्यांच्यामध्ये कामाचा उत्साह कायम होता. त्यांचे कार्य प्रत्येकांपुढे आदर्श म्हणून राहील.  -भरत जाधव, अभिनेते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्यासाठी ही अत्यंत दु:खद बातमी आहे. हे मनोरंजनसृष्टीचे नुकसान आहेच, शिवाय माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले आहे. आमच्यामध्ये सुरवातीपासूनच बंधुप्रेम होते. मी त्यांना रमेश भय्या म्हणायचो. माझ्याप्रती त्यांना प्रचंड आस्था होती. मी चित्रपटासाठी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो तेव्हा माझ्यासमोर रमेश देव उभे होते. ‘आयलय तूफान दर्याला’ हा तो चित्रपट. त्या चित्रपटापासून माझी खरी कारकीर्द सुरू झाली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांत मी काम केले आहे.    -अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते