Aatli Baatmi Futlii movie trailer release नामवंतांची उपस्थिती, सांगीतिक चमूने संगीत निर्मितीचे उलगडलेले सुखद अनुभव आणि निरनिराळ्या धमाकेदार सादरीकरणाने ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताचा रंगला. वीजी फिल्म्स बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.

आयुष्याच्या प्रवासात एकमेकांवरील विश्वास महत्त्वपूर्ण ठरत असतो आणि पती – पत्नीचे नाते प्रेम व विश्वासावर टिकून असते. परंतु काही कारणास्तव याच नात्यात कटुता येऊन जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका नवऱ्याची आणि सुपारी घेणाऱ्या व्यक्तीची उडणारी त्रेधातिरपीट दाखविणारा ‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या चित्रपटाची कथा एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती फिरते. ही खूनाची सुपारी नेमके कोणते वळण घेणार? या वळणावर कोणते बंध निर्माण होणार? याची धमाल कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतील नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदी कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला ‘आतली बातमी फुटली’ चित्रपट धमाल आणणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या सादरीकरणाने रंगत आणली. तसेच सांगीतिक सादरीकरणानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’, ‘जालीम सरकार’, ‘आतली बातमी फुटली’ हे रॅप अशी वेगवेगळ्या शैलीतील चार गाणी या चित्रपटात आहेत.

आपल्या मराठी पदार्पणाबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल पी. गांधी म्हणाले की, ‘मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटाचे विषय या सगळ्याबद्दल मला नेहमी आकर्षण राहिले आहे. चित्रपटाचा आशय हे मराठी चित्रपटाचे बलस्थान राहिले आहे. त्यामुळे मनोरंजक आणि तितकाच दर्जेदार आशय आणताना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न मी ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटात केला आहे. हा चित्रपट सिच्युएशनल कॉमेडी असून प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे’.

तसेच ‘सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत असलेला हा धमाल मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल’, असा विश्वास निर्मात्या ग्रीष्मा अडवाणी, सहनिर्माते अम्मन अडवाणी यांनी व्यक्त केला. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी, तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. छायांकन अमित सुरेश कोडोथ, तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे.

कथा जैनेश इजरदार यांनी, तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे. तसेच वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची आणि नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. पात्रनिवड (कास्टिंग) जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत.