कुलदीप घायवट, लोकसत्ता

मुंबई : भारतीय रेल्वेचा प्रत्येक झोन, विभाग आणि त्याच्या उपविभागाचे समाज माध्यमावर स्वतंत्र खाती आहे. रेल्वे संदर्भातील महत्त्वाची माहिती त्या खात्यावर प्रसारित केली जाते. तसेच प्रवासी आपल्या तक्रारी, समस्या त्यावर मांडतात. प्रत्येक विभागाचे नाव हे त्याच्या समाज माध्यमावरील खात्याला दिले जाते. मात्र, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हे खाते अधिकाऱ्याच्या नावाने सुरू होते. वैयक्तिक नावाला आक्षेप घेत मराठी तरुणाने रेल्वे मंडळाकडे तक्रार केली. त्यानंतर ‘एक्स’ (ट्विटर) खात्याचे नाव ‘डीआरएम पुणे’ करण्यात आले.

मध्य रेल्वेअंतर्गत मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर असे पाच विभाग आहेत. या प्रत्येक विभागाचे प्रमुख पद हे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) असते. प्रत्येक विभागातील संबंधित सर्व घटनांची जबाबदारी ही डीआरएमच्या खांद्यावर असते. त्यामुळे रेल्वे विभागात या पदाला अनन्य साधारण महत्त्व आहे. यासह समाज माध्यमावरील या विभागाच्या खात्यावरून अद्ययावत माहिती प्रवाशांना दिली जाते. मात्र गेल्या काही कालावधीपासून ‘एक्स’ खात्यावरील डीआरएम पुणे विभागाचे नाव वैयक्तिक स्वरुपाचे होते.

आणखी वाचा-मुंबई : मोनोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या पुणे विभागाच्या डीआरएम असलेल्या इंदू दुबे यांच्या नावाने ‘श्रीमती इंदू दुबे’ असे खाते चालवल्याचे तक्रारदार आनंदा पाटील यांच्या दृष्टीस पडले. तसेच या खात्यावरून मराठी वापर होत नव्हता. त्यामुळे पाटील यांनी रेल्वे मंडळाकडे याबाबत २९ ऑक्टोबर रोजी तक्रार केली. रेल्वे विभागाच्या शासकीय ‘एक्स’ खात्यावर वैयक्तिक नाव वगळणे आणि खात्यावर मराठीचा वापर करणे, असे तक्रारीत नमुद करण्यात आले होते. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत नुकताच या खात्याचे नाव बदलण्यात आले. तसेच मराठीचा वापर ‘एक्स’सह सर्व समाज माध्यमावर करत असल्याचे पुणे डीआरएमकडून स्पष्ट करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या ‘एक्स’ डीआरएम पुण्याचे एकूण १७ हजार ५४४ अनुयायी आहेत. तर, डीआरएम मुंबईचे ८६ हजार, डीआरएम नागपूरचे २० हजार ७६२, डीआरएस भुसावळचे २२ हजार ७५२ अनुयायी आहेत.